Fri, Sep 20, 2019 21:54होमपेज › Goa › हिंमत असल्यास मडगावातून निवडणूक लढवा

हिंमत असल्यास मडगावातून निवडणूक लढवा

Published On: Jan 08 2019 1:37AM | Last Updated: Jan 08 2019 12:03AM
मडगाव : प्रतिनिधी 

मडगावचे आमदार  तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शहरात  जिल्हाधिकारी कार्यालय, इस्पितळ, रवींद्र भवन, एसजीपीडीए मार्केट आदी प्रकल्प केले आहेत तरीही  त्यांनी काहीच केले नाही असा आरोप कृषीमंत्री विजय सरदेसाई करीत आहेत. कामत यांच्यावर  आरोप करणार्‍या  मंत्री  सरदेसाई यांनी हिंमत असेल तर मडगावातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान मडगाव अल्पसंख्याक गटाचे रियाज शेख यांनी रविवारी मडगावात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या पक्षाच्या अल्पसंख्याक मेळाव्यात केले.

रूमडामळ-दवर्ली येथील अंजूमन हॉलमध्ये रविवारी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाने  मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात रियाज शेख बोलत होते. व्यासपीठावर   प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार दिगंबर कामत, अश्रफ पंडियाल, उर्फान मुल्ला होते.

रियाज शेख   म्हणाले, की भाजपकडून अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेे. निवडणूक जवळआली की अल्पसंख्याकांना जवळ केले जाते व नंतर त्यांना दूर ठेवले जाते. अल्पसंख्याकांसाठी कोणीच कामे केली जात नाहीत. अपसंख्याक पदवीधर झाले तरी त्यांना नोक़र्‍या मिळविण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही. अशिक्षितांसाठी कोणत्याच योजना नाहीत.  केवळ काँग्रेस पक्षानेच अल्पसंख्याकांचे हित जपले आहे.

देश हा एका ठराविक धर्माचा किंवा जातीचा असू शकत नाही. घटनेत सर्व धर्मांना व जातीना अधिकार दिलेले आहेत. परंतु, सरकार या ठिकाणी अल्पसंख्याकांवर अन्याय करीत आहे. अल्पसंख्याकांसाठी असलेल्या योजनापैकी 30 टक्के योजना बंद केल्या आहेत.  नोकर भरती करताना सुद्धा सरकार भेदभाव करीत आहे. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हे अल्पसंख्याक विरोधी आहे.  देश एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाचीच गरज आहे व अल्पसंख्याकांनी काँग्रेस सोबत रहावे असे आवाहन  गिरीश चोडणकर यांनी केले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देश प्रगतीपथावर नेण्यासाठी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचे योगदान दिले आहे. जितके पंतप्रधान  झाले, त्या सर्वांनी देशाच्या हितासाठी काम केले. काँग्रेस पक्षच सर्वांना सोबत घेऊन जाऊ जाणारा पक्ष आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना सांगितले.