Sat, Jul 04, 2020 04:46होमपेज › Goa › खाणबंदीवर तोडगा न निघाल्यास सरकारविरोधी प्रचार : पुती गावकर

खाणबंदीवर तोडगा न निघाल्यास सरकारविरोधी प्रचार : पुती गावकर

Published On: Mar 03 2019 12:48AM | Last Updated: Mar 03 2019 12:48AM
पणजी : प्रतिनिधी

निवडणूक  आचारसंहिता लागू होईपर्यंत सरकारला खाण प्रश्‍न सोडवता न आल्यास निवडणूक काळात प्रत्येक मतदारसंघात जाऊन सरकार विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे  नेते पुती गावकर यांनी दिली.

खाण अवलंबितांचा प्रश्‍न सोडवण्यात सरकारला अपयश आले आहे. मात्र, असे असूनही सरकारकडून केवळ आश्‍वासनेच दिली जात आहेत. त्यामुळे आता खाण अवलंबित आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत वाट पाहणार आहेत.   त्यानंतर पुढील कृती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गावकर म्हणाले, गोव्यातील खाण व्यवसाय बंद होऊन वर्ष उलटले. सर्वोच्च न्यायालयाच्या  खाण बंदीच्या निर्णयानंतरदेखील सरकारकडून आवश्यक ते प्रयत्न खाणी सुरु करण्यासाठी करण्यात आले नाहीत. सरकारकडून केवळ आश्‍वासनांचे गाजर दाखवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खाणबंदीवर तोडगा काढण्यात अपयश आल्याप्रकरणी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली. यात गोवा बंदचादेखील समावेश होता. मात्र, तरीदेखील खाण अवलंबितांच्या पदरात केवळ निराशाच पडली आहे. त्यामुळे आता सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता लागू होण्याची वाट पाहिली जात आहे. आचारसंहिता लागू होताच प्रत्येक मतदारसंघात जाऊन सरकारविरोधात काम केले जाईल, असा निर्णय   खाण अवलंबितांनी घेतला आहे. खाणप्रश्‍नी गप्प राहणार नाही.  खाण बंदीवर  सरकारला तोडगा काढावाच लागणार, असेेही गावकर यांनी  सांगितले.