Wed, May 27, 2020 10:47होमपेज › Goa › म्हादईबाबतचे पत्र मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसमवेत आंदोलनात उतरू

म्हादईबाबतचे पत्र मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसमवेत आंदोलनात उतरू

Last Updated: Dec 02 2019 1:46AM
पणजी : प्रतिनिधी
म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कर्नाटकाला देण्यात आलेले परवाना पत्र मागे न घेतल्यास आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह म्हादई बचाव आंदोलनात सामील होऊ, अशा शब्दांत  जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

येथील एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री रॉड्रिग्स यांनी ही माहिती दिली. रॉड्रिग्स म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून म्हादईसंबंधी दिलेले परवानापत्र मागे घेण्याबाबत मुदत मागून घेतली जात आहे. हा विषय संवेदनशील असल्याने सावधगिरीने पावले टाकणे जरूरीचे आहे. आमचा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर विश्‍वास असून ते गोव्याच्या हिताचे रक्षण करणार असल्याचा विश्‍वास आहे. सदर पत्र मागे घेतल्याने हा विषय संपणार नाही. म्हादईविषयी अनेक वर्षांपासून राजकीय वाद असून अनेक राज्य सरकारांचा यात कस लागला होता. 

रॉड्रिग्स म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 20 नोव्हेंबर  रोजी कर्नाटकाला दिलेले पत्र मागे घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत मागून घेतली आहे. ही मुदत आता 5 डिसेंबरला संपणार असून जर ते पत्र मागे घेतले नाही तर आपण आणि मुख्यमंत्री सावंत आंदोलनात सामील  होण्यास तयार आहोत. म्हादईबाबत सुरू असलेले युद्ध आता सर्वोच्च न्यायालयाकडून दाद मिळाल्याशिवाय सुटणार नाही. कदाचित आम्हा आमदारांची मुदत संपली तरी हे युद्ध अंतिम निर्णय होईपर्यंत लढावे लागणार आहे.