Mon, May 25, 2020 04:36होमपेज › Goa › शिरोड्यात भाजपचा प्रचार करणार : मंत्री गावडे

शिरोड्यात भाजपचा प्रचार करणार : मंत्री गावडे

Published On: Mar 27 2019 1:51AM | Last Updated: Mar 27 2019 12:32AM
पणजी : प्रतिनिधी 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने  शिरोडा मतदारसंघात पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.  मगो पक्षाने गेल्या दोन वर्षांपासून सत्ता उपभोगली असून स्वतःचा फायदा पाहून आता निवडणुकीत उतरत आहे. मगो पक्ष  सरकारचे खाऊन सरकारलाच दगा देत आहे. आपण शिरोड्यात भाजपचा प्रचार करणार  आहे, असे  कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. येथील कला अकादमीत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री गावडे बोलत होते.  ते म्हणाले, आपला भाजपच्या उमेदवारालाच संपूर्ण पाठिंबा असेल. भाजपने आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून आपण सुभाष शिरोडकर यांच्या बाजूनेच प्रचार करणार आहे.

राज्यात भाजपचे सरकार असून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा घटक पक्ष आहे.  शिरोड्यात भाजप  उमेदवारांविरोधात निवडणूक रिंगणात उतरून मगोचे अध्यक्ष भाजप विरोधी कारवाया करीत आहेत. याला मगोचे नेतृत्व जबाबदार आहे. सरकारच्या स्थिरतेला धोका पोहचविण्याचा मगो पक्षाचा हा प्रयत्न आहे. शिरोड्यातून मगोला पोटनिवडणूक लढवायची असल्यास त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे व त्यानंतर पुढील रणनीती ठरवावी. युतीत राहून सरकारविरोधी कारवाया करणे चुकीचे आहे. अनेक वर्षे मगो पक्ष सत्तेत आहे. मगोची भूमिका कोणत्याच युती धर्मात बसत नाही. मगोपचे दोन आमदार फुटल्यास त्यांच्या पक्षाचे  अस्तित्वच राहणार नाही. तिथेच मगोचा शेवट होईल, असेही गावडे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे अन्य खात्यांचा पदभार सांभाळायच्या अपेक्षेत आम्ही मंत्री आहोत. परंतु, आपण स्वतंत्र जनतेचा स्वतंत्र आमदार आहे. आपण कधीच कुणाकडे काही मागितले नाही. काहीच न मागता मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देणारा आपण एकमेव आमदार असेन. आपण योग्यतेवर विश्‍वास ठेवतो. अन्य कुणी खाती किंवा महामंडळाची मागणी करत असेल तर तो त्यांचा विषय आहे. त्यावर आपण काही बोलू शकत नाही. योग्यतेप्रमाणे मुख्यमंत्री अन्य खाती वितरित करतील. आपण जबाबदारी घेण्यास पात्र असेन तर मुख्यमंत्री आपल्याला अन्य खाते सांभाळण्यास देतील, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.