Thu, May 28, 2020 05:40होमपेज › Goa › नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Last Updated: Mar 21 2020 1:14AM
पणजी ः पुढारी वृत्तसेवा 

‘कोरोना व्हायरस’च्या वाढत्या प्रसारामुळे शनिवारपासून (दि. 21 मार्च) राज्यातील विद्यार्थ्यांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढील आदेश मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे पत्रक शुक्रवारी शिक्षण संचालक वंदना राव यांनी जारी केले आहे. 

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ‘कोरोना व्हायरस’चा प्रसार रोखण्यासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे शिक्षण खात्याने पालन केले आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शुक्रवारी शिक्षण संचालक वंदना राव यांनी काढलेल्या नव्या पत्रकात म्हटले आहे, की राज्यातील विद्यार्थ्यांच्या नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढील आदेश मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हा आदेश शनिवारपासून लागू करण्यात आला असून यामध्ये राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावी परीक्षांचाही समावेश आहे. 

याआधी, शिक्षण खात्याने काढलेल्या अनेक पत्रकांमुळे शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्यांदा, राज्यातील सर्व शाळा 16 मार्चपासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. यावर अनेक शाळांनी आक्षेप घेतल्यावर, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचे पत्रक शिक्षण खात्याकडून काढण्यात आले होते. त्यात बदल करताना, आधी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, जर परीक्षा सुरू असेल वा सुरू होणार असतील तर त्या कायम असतील, असे पत्रक खात्यातर्फे काढण्यात आले होते.

यात, आता शुक्रवारी नव्याने बदल करताना मागील सर्व पत्रके रद्द करून, नववी ते बारावी पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, शाळांच्या ज्या परीक्षा याआधीच घेण्यात आल्या आहेत, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांनाही शाळेत येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शाळांच्या दैनंदिन व्यवहारासाठी गरज असलेल्या शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कार्यालयात बोलावण्यास हरकत नाही.