Thu, Jul 02, 2020 13:45होमपेज › Goa › हॉटेल्सच्या जीएसटीत कपातीची शक्यता

हॉटेल्सच्या जीएसटीत कपातीची शक्यता

Published On: Sep 19 2019 1:29AM | Last Updated: Sep 19 2019 1:29AM
पणजी : प्रतिनिधी
हॉटेल्सना लागू असलेल्या  जीएसटीचा विषय शुक्रवारी राज्यात होत असलेल्या 37 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत चर्चेला येणार असून पंचतारांकित हॉटेल्सना लागू असलेली जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. आपण मंडळाच्या निर्णयाआधी अधिक काहीही सांगू इच्छित नाही. मात्र, देशाच्या हिताच्या द‍ृष्टीने योग्य तो निर्णय जाहीर केला जाईल, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

गुदिन्हो म्हणाले, की केंद्र आणि राज्य सरकारला चांगला महसूल मिळणे गरजेचे आहे. आज देशात आर्थिक मंदी आली असली तरी ही स्थिती तात्पुरती  आहे. लवकरच पुन्हा आर्थिक व्यवस्थेत जोम येणार असून स्थिती पूर्ववत होणार आहे. मंदीचा  परिणाम केवळ काही काळापुरता   जाणवणार आहे. 

राज्यात  शुक्रवार (दि.20) जीएसटी परिषदेची बैठक होत असून या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री अथवा अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असून देशातील   जनतेच्या हिताचे निर्णय बैठकीत होतील, असा विश्‍वास पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्‍त केला.

देशात जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच ही बैठक गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीविषयी गुदिन्हो म्हणाले, की जीएसटी मंडळाची दोन दिवसांची बैठक गोव्यात आयोजित करण्यात आली असून या बैठकीची राज्य सरकारने तयारी केली आहे. पहिल्या दिवशी, म्हणजे 19 रोजी जीएसटीशी संबंधित केंद्रीय वित्तीय सचिव व अन्य सुमारे 200 अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक  होणार आहे. या बैठकीचा अजेंडा हा भलामोठा असून आपण  देशभरातील अनेक बैठकांना हजेरी लावली असली तरी एवढा मोठा अजेंडा कधीही पाहिलेला नाही.  

गुदिन्हो म्हणाले, की देशातील अनेक  वस्तू आणि सेवांचे दर उतरण्याची अपेक्षा आहे.राज्यातील हॉटेल व्यावसायिकांनी तसेच ‘टीटीएजी’ने हॉटेलातील खोल्यांवरील 28 टक्के जीएसटी 18 टक्क्यांवर आणण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्सचे दर महागडे असल्याने पर्यटकांची संख्या 30 टक्क्यांनी घसरली आहे. राज्यातील खाणी सध्या पूर्णपणे बंद पडल्याने आम्ही आता पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहोेत. 

व्यावसायिक  कर आयुक्‍त दीपक बांदेकर यांनी सांगितले, की राज्यातील बेकरी व्यवसायाला नव्या जीएसटीचा त्रास होत असून बेकरी संबंधित व्यवसायांना लागू असलेल्या जीएसटीत बदल करण्याबाबत शुक्रवारच्या बैठकीत चर्चा होणार आहे. ही बैठक गोव्यात होत असली तरी त्यात राज्यासंबंधीचेच विषय 
चर्चेला येतील, असा अर्थ कोणी लावू नये. 

वाहनांवरील जीएसटी घटण्याची शक्यता

ऑटोमोबाईल्स, बिस्कीट, बेकरी, रिअल इस्टेट व काही जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटीचा सर्वात कमी 5 टक्के असलेला दर किमान 8 टक्के होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनी एकाच टक्केवारीने कर आकारणी करण्याची मागणी केली असून त्यावरही विचार होणार आहे. या बैठकीत नवी जीएसटी नोंदणी ‘आधार’कार्डशी जोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. रेती, खडी आदी बांधकाम साहित्यावरील सध्या 5 टक्के असलेला जीएसटी 12 टक्क्यापर्यंत नेण्याचाही विचार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.