Wed, May 27, 2020 04:15होमपेज › Goa › सांगेतून ‘होम क्वारंटाईन’ गायब

सांगेतून ‘होम क्वारंटाईन’ गायब

Last Updated: Mar 29 2020 11:20PM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे रुग्ण गोव्यातही आढळून आल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरू लागले असून त्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि आरोग्य खात्याने ताबडतोब पावले उचलून होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यास सुरू केले आहे. मडगाव शहरात 43 जण, कुडचडे सावर्डे पोलिस स्थानक कार्यक्षेत्रात 45 तर सांगेत तब्बल 114 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सांगेतून एक क्वारंटाईन व्यक्ती अचानक गायब झाल्यामुळे प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्यासुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे विदेशवारी करून आलेल्या लोकांना घरी राहण्याचा सल्ला आरोग्य खाते देत आहे, तर दुसरीकडे त्याच व्यक्ती स्वतःहून बाजारात फिरू लागल्या आहेत. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांना शोधून त्यांना देखरेखीखाली ठेवताना आरोग्य खाते आणि पोलिस खात्याची मात्र तारांबळ उडू लागली आहे. दक्षिण गोव्यात सर्वात जास्त क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती सांगेत आहेत. सुरुवातीला कोरोना संशयित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चौदा दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण आता या व्यक्तींवर अठ्ठावीस दिवस देखरेख ठेवण्याची सूचना आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या आहेत. काही पोलिस आणि आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असता होम क्वारंटाईन करण्यात आलेले लोक सहकार्य करत नसल्याचे त्यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार कुडचडे पोलिस स्थानकाच्या अंतर्गत येणार्‍या कुडचडे मतदारसंघ आणि सावर्डे मतदारसंघातील काही भागात एकूण 45 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. यात सावर्डेत 16, काकोडात 14, दाभाळ 9, करमणे 1, कुडचडे शहर 3 आणि शेळवण येथील 2 व्यक्तींचा समावेश आहे.

मडगाव शहरात 43 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, अशी माहिती हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.आयरा आल्मेदा यांनी दिली. या लोकांच्या तपासणीसाठी वैद्यकीय अधिकार्‍यांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यातील दोन पथके राखीव ठेवण्यात आलेली आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

सांगेतील मोठ्या प्रमाणात नागरिक विदेशात नोकरीला आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी पुन्हा गोवा गाठलेला आहे. आरोग्य खात्यातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 114 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. यातील निम्मे लोक विदेशातून आलेले आहेत. सांगेतील एका व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरापासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. पण अजून ती व्यक्ती न सापडल्याने त्याच्या गायब होण्यामागील गूढ वाढत चालले आहे. त्या व्यक्तीच्या शोधासाठी आरोग्य केंद्राने सांगेचा अतिशय दुर्गम भाग असलेले पोत्रे हे गावसुद्धा पायी तुडवले आहे. ही व्यक्ती बाहेर फिरत असल्यास इतरांसाठी ते धोकादायक ठरू शकते, त्यामुळे त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर अधिकार्‍यांनी दिली.