होमपेज › Goa › सभापती लोबोंसह मंत्री आजगावकर, पाऊसकर यांना उच्च न्यायालयाची नोटीस 

सभापती लोबोंसह मंत्री आजगावकर, पाऊसकर यांना उच्च न्यायालयाची नोटीस 

Published On: Apr 23 2019 1:33AM | Last Updated: Apr 23 2019 1:33AM
पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले मंत्री बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गोवा विधानसभेचे सभापती मायकल लोबो तसेच वरील दोन्ही मंत्र्यांना नोटीस बजावली. या याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवार दि.30 एप्रिल रोजी होणार आहे. सदर याचिका सदानंद वायंगणकर यांनी दाखल केली आहे. 

बाबू आजगावकर हे उपमुख्यमंत्री तर दीपक पाऊसकर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. या दोघांनी 27 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी दोन तृतीयांश बहुमत सोबत असल्याने मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचे पत्र सभापती मायकल लोबो यांना सादर केले होते. त्यानुसार या विलिनीकरणाला 27 मार्च रोजीच सभापतींनी मान्यता दिली होती.

सभापती लोबो यांच्या निर्णयाला वायंगणकर यांनी आव्हान देऊन उपमुख्यमंत्री आजगावकर व मंत्री पाऊसकर यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. सभापतींना पक्ष विलीनीकरणाला मान्यता देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सभापती लोबो यांचा तो निर्णय बेकायदेशीर असून दोन्ही मंत्र्यांची कृती योग्य ठरवण्यासाठी मुद्दामहून घेण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन्ही मंत्री अपात्र ठरत असल्याचे वायंगणकर यांनी आपल्या आव्हान याचिकेत नमूद केले आहे. मगो व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण होऊन मगो भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत होते, 

यामुळे सरकार अस्थिर बनले असते. त्यामुळेच भाजपने खेळी करून आजगावकर व पाऊसकर यांना मगो पक्षातून फोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर मंत्री आजगावकर यांना उपमुख्यमंत्रिपद तर आमदार पाऊसकर यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. यासंदर्भातील कागदपत्रे सभापती लोबो यांना सादर केली. महत्वाचे म्हणजे यावेळी मुख्यमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हेदेखील उपस्थित होते, असेही या आव्हान याचिकेत नमूद करण्यात आले आहे.