Sat, Sep 21, 2019 05:52होमपेज › Goa › दुसर्‍या दिवशीही पावसाने झोडपले

दुसर्‍या दिवशीही पावसाने झोडपले

Published On: Jun 13 2019 1:32AM | Last Updated: Jun 13 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी दिवसभर ठिकठिकाणी मान्सूनपूर्व जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, राज्यात जोरदार पाऊस व वार्‍यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. राज्यात 16 व 17 जून रोजी विजांचा कडकडाट व वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मडगावात सर्वाधिक 5.13 से. मी. पावसाची गेल्या 24 तासात नोंद झाली.

फोंडा, सत्तरी, सासष्टी तालुक्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दक्षिण गोव्यात विविध 17 ठिकाणचे वीज खांब,  तर कवळेत दोन ठिकाणचे  वीज खांब उखडले. शिरोड्यात दोन घरांवर तर डिचोलीत कारापूर येथे कुंपणावर झाड पडून हानी झाली. फर्मागुडीत एका कारवर झाड पडून मोठी हानी झाली.

पणजीत बुधवारी  दिवसभर  पाऊस सुरू होता. पाऊस व घोंघावणार्‍या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार घडले. गोवा अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पणजीत नेवगीनगर येथे चार चारचाकी वाहनांवर झाड कोसळल्याने 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सांत इनेज येथे रस्त्यावर झाडाच्या फांद्यांची पडझड झाली. एका घरावर झाडाची फांदीदेखील पडली.  सांताक्रुज येथे विजेच्या खांब्यावर फांदी पडल्याने या ठिकाणी काही काळासाठी वीज खंडित होती. पर्वरी, करंझाळे व मिरामार दोनापावला रस्त्यावरही पडझडीचे प्रकार घडले.  

पणजीत दिवसभर पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. पावसामुळे पदचारी तसेच वाहन चालकांना पाण्यातून वाट काढत जाताना बरेच त्रास झाले.  मिरामार समुद्रकिनार्‍यावर पाण्याची पातळी वाढल्याने लाटा किनार्‍यावर पर्यंत येत होत्या. दोनापावला येथे देखील वरपर्यंत फेसाळ लाटा उसळत होत्या. 

राज्यात गेल्या 24  तासात पडलेल्या पावसानंतर कमाल तापमान 32.3 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24  अंश सेल्सिअस  इतके नोंद झाले. येत्या 24 तासात तापमानात अधिक घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  कमाल तापमान 31  अंश सेल्सियस व किमान तापमान 23 अंश सेल्सियस इतके घटण्याची शक्यता आहे. तसेच मुरगाव भागात तापमानात  याहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. 

‘वायू’च्या तीव्रतेत वाढ

अरबी समुद्रात घोंघावत असलेले वायू चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकत असून, 13 जून रोजी  सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून, ताशी 145 ते 170 किमी. वेगाने समुद्रात वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.