Thu, May 28, 2020 20:36होमपेज › Goa › आरोग्यमंत्री राणेंविरुद्ध अपात्रता याचिकेवर 2 मे रोजी सुनावणी

आरोग्यमंत्री राणेंविरुद्ध अपात्रता याचिकेवर 2 मे रोजी सुनावणी

Published On: Apr 26 2019 1:49AM | Last Updated: Apr 26 2019 1:49AM
पणजी : प्रतिनिधी

आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्या विरोधात अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर आपण येत्या 2 मे रोजी सुनावणी घेणार आहे. कोणतीही याचिका अधिक काळ प्रलंबित ठेवणे हे चुकीचे असून आपण ती लवकरच हातावेगळी करणार असल्याचे प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी गुरुवारी सांगितले.    आमदार गावकर आणि प्रतिवादी विश्‍वजित राणे यांना 2 मे रोजी सभापतीच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे सभापती लोबो यांनी सांगितले. 

लोबो म्हणाले, की आमदार गावकर यांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. लोकांना कुठल्याही प्रकारच्या न्यायालयासमोर न्याय मिळायला हवा. याशिवाय, मंत्री राणे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार  ठेवणेही संयुक्तीक नाही. आपण याचिकेचा अभ्यास केला असून कायदे तज्ज्ञांचाही सल्ला घेणार आहे.  

तत्कालीन मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडी सरकारची स्थापना 2017 सालच्या मार्च महिन्यात झाली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवसातच विश्‍वजीत राणे यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी  भाजप सरकारच्या विधानसभेतील विश्‍वासदर्शक   ठरावाच्या वेळी तत्कालीन काँग्रेसचे आमदार असूनही  आणि काँग्रेसने ‘व्हीप’ बजावलेला असतानाही  विश्‍वजित राणे यांनी मतदानात भाग घेतला नव्हता. नंतर त्यांनी  तत्कालीन हंगामी सभापती सिध्दार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला होता.  काँग्रेसतर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात राणेंविरोधात मे -2017 मध्ये अपात्रता याचिका दाखल करण्यात आली होती.

 या याचिकेवरील सुनावणी 2017च्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अपात्रता याचिकेवरील सुनावणीचा अधिकार सभापतींना असून काँग्रेसने सभापतींकडे ही याचिका सादर करणे आवश्यक असल्याचे मत  व्यक्त केले. त्यामुळे याचिकादार काँग्रेसने सभापतींसमोर राणे यांच्याविरोधात अपात्रता याचिका सादर करावी, असे न्यायालयाने काँग्रेसला सांगितले होते. मात्र, काँग्रेसने सभापतींकडे अपात्रता  याचिका सादर करण्याचा पर्याय न निवडता न्यायालयानेच निर्णय घ्यावा, असा आग्रह धरल्यानंतर  न्यायालयाने निवाडा देताना आरोग्य मंत्री राणे यांच्या विरोधात काँग्रेसने दाखल केलेली अपात्रता याचिका  फेटाळली गेली होती. त्यानंतर काँग्रेसने न्यायालयाने याचिका फेटाळल्याने सभापतींकडे जाण्याच्या पर्यायावर विचार चालवला होता. काँग्रेसतर्फे सभापतीकडे अपात्रता याचिका दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याआधीच अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी विश्‍वजीत राणे यांना अपात्र ठरवण्याबाबत याचिका दाखल केली होती.