Wed, Jul 08, 2020 13:56होमपेज › Goa › आरोग्यमंत्री राणेंची पोलिस महासंचालकांकडे तक्रार

आपल्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 1:52AM
पणजी : प्रतिनिधी

आपल्या नावाने  व्यावसायिकांकडून खंडणी मागितली जात असल्याची तक्रार आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी अज्ञात व्यक्‍तिविरोधात पोलिस महासंचालक  प्रणब नंदा यांच्याकडे दाखल केली आहे. 
मंत्री राणे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत ज्या फोन क्रमांकावरून लोकांकडून खंडणी मागितली जात आहे, तो क्रमांक नमूद केला आहे. 

मंत्री राणे यांनी दिलेल्या तक्रारीत,  काही दिवसांपासून आपल्या नावाने एक अज्ञात व्यक्‍ती शहरातील काही लोकांना व  नामांकित व्यावसायिकांना फोन करून खंडणी मागत आहेत.  ज्या फोनवरून ही खंडणी मागितली जात आहे, तो नंबर कुणाचा आहे याची कल्पना नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.  1814 या हेल्पलाईनवर आपल्या नावाने बनावट कॉल करण्यात आला होता. त्या आवाजाचे रेकॉर्डिंग करण्यात आले.  या रेकॉर्डिंगची आवश्यकता  भासल्यास ती पोलिस खात्याला सादर केली जाईल. सदर प्रकार म्हणजे आपल्या नावाचा गैरफायदा घेऊन आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मंत्री राणे यांनी तक्रारीत केला आहे.  

या प्रकारामुळे गोंधळ निर्माण  होण्याबरोबरच लोकांकडून पैसे देखील मागितले जात आहेत. त्यामुळे पोलिस खात्याने  सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संशयितावर कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.