Mon, May 25, 2020 12:43होमपेज › Goa › राज्यपालांनी मंत्र्यांच्या वक्तव्यांची दखल घेऊन कारवाई करावी : गिरीश चोडणकर

राज्यपालांनी मंत्र्यांच्या वक्तव्यांची दखल घेऊन कारवाई करावी : गिरीश चोडणकर

Last Updated: May 02 2020 1:24AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर व कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी राज्यात सर्रास भ्रष्टाचार चालतो, हे उघडपणे मान्य केले आहे. यावरून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारात गौडबंगाल चालले असल्याचे स्पष्ट होते. मंत्री आजगावकर व लोबो यांनी केलेल्या विधानाची राज्यपालांनी दखल घ्यावी व या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण घ्यावे. राज्यपाल हे राज्याचे घटनाप्रमुख आहेत. दोन मंत्र्यांनी केलेली भ्रष्टाचाराला मान्यता देणारी जाहीर वक्तव्ये म्हणजे राज्यपालांच्या घटनात्मक पदाचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांनी याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शुक्रवारी जारी केलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. 

राज्याचे घटनाप्रमुख असलेले राज्यपाल सत्यपाल मलिक हे स्पष्टवक्ते असून, गोव्याबद्दल त्यांना कळकळ आहे. गोमंतकीयांचे प्रश्न त्यांनीच दिल्लीत पोचवले असून गोमंतकीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यपालांनी सदर दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांची चित्रफीत राष्ट्रपतींना पाठवून राज्यातील भाजप सरकार बडतर्फ करण्याची शिफारस करावी, अशी मागणीही चोडणकर यांनी केली. 

बाबू आजगावकर व मायकल लोबो तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री व स्वत: मुख्यमंत्री यांची भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे काँग्रेस पक्षाने वेळोवेळी उघड केली आहेत. यात उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, माविन गुदिन्हो, दीपक पाऊसकर, मिलींद नाईक, विश्वजीत राणे व अन्य मंत्र्यांचा समावेश आहे. यासंदर्भात कारवाई न करून, मुख्यमंत्री डॉ. सावंत हे आपली खुर्ची सांभाळण्यासाठी जनतेचे पैसे लुटण्यास आपल्या मंत्रिमंळातील सहकार्‍यांना मूक संमती देत असल्याचे दिसून येते, असेही चोडणकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली तसेच उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरणात मंत्री लोबो यांनी केलेले घोटाळे उघड आहेत. कचरा व्यवस्थापन मंत्रालय घेऊन मायकल लोबो यांनी कचरा साफ करण्याचे सोडून सरकारी तिजोरीच साफ केली आहे. पर्यटन व क्रीडा खात्यात ’मिशन 30 टक्के कमिशन’ चा अजेंडा राबवून आजगावकरांनी सरकारी तिजोरी लुटली आहे. स्वत: पर्यटक बनून आपल्या कुटुंबीयांसोबत विदेश दौरे केले आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातही कंत्राटदारांकडून प्रत्येक कामावर लूटमार केली आहे. किनारे सुरक्षा व किनारे स्वच्छता कंत्राटातही पर्यटनमंत्र्यांनी आपला स्वार्थ साधला आहे. विधानसभेतील माहितीच्या आधारे लेखी तक्रार करुनही तसेच लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेले असतानाही माजी मुख्यमंत्री पर्रीकर तसेच विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजगावकरांनाच अभय दिले आहे, असेही चोडणकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.