Wed, May 27, 2020 17:10होमपेज › Goa › गोव्यात राजकीय नाट्य सुरूच; सुदीन ढवळीकरांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटविले

गोवा : ढवळीकरांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटविले

Published On: Mar 27 2019 1:35PM | Last Updated: Mar 27 2019 3:30PM

file photoपणजी : प्रतिनिधी

गोव्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. गोव्याचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी दूपारी १ वाजता जारी केली. दरम्यान, ढवळीकर यांच्या जागी आता भाजपात प्रवेश केलेल्या दीपक पाऊसकर यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. त्यांचा शपथविधी आज, बुधवारी रात्री ७.३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोव्यात मध्यरात्री घडलेल्या राजकीय घडामोडीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर अशी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोन आमदारांची नावे आहेत. त्यांनी मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करत असल्याचे पत्रही गोवा विधानसभेचे सभापती मायकल लोबो यांना सादर केले आहे. 

परराज्याच्या दौर्‍यावर असलेल्या राज्यपाल आज, बुधवारी संध्याकाळी राज्यात परतणार आहेत. या दरम्यान, मगोच्या केंद्रीय कार्यकारिणीची दुपारी बैठक होणार असून त्यात मगो काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मगो पक्ष फोडण्याचा याआधीही प्रयत्न झाले होते, मात्र त्यामुळे पक्षाचे फारसे नुकसान झाले नसले तरी ज्यांनी पक्षांतर केले ते मात्र राजकारणातून नाहिसे झाले आहेत. याआधी काँग्रेसचे मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांची सत्ता असताना मगोतील रमाकांत खलप आणि प्रकाश वेळीप या आमदारांनी मगो सोडला होता. हे दोन्ही राजकारणी आजपर्यंत पुन्हा निवडून आले नाहीत. तसेच बहुमतात असूनही फालेरो यांचे सरकार सहा महिन्यात कोसळले होते, याची लोकांनी आठवण ठेवावी. आज आपण मोकळा झालो आहे. मगो हा जनमानसात रूजलेला पक्ष आहे. भर मध्यरात्री चौकीदारांनी मगो पक्षावर घातलेला हा दरोडा पाहून गोमंतकीयही अचंबित झाले आहेत.

भाजपात प्रवेश केलेले दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की आपल्या मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला. आपल्याला मंत्रिपद देण्याची ऑफर भाजपकडून आली असून यामुळे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे.