Mon, May 25, 2020 04:12होमपेज › Goa › सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये : बाबू कवळेकर

सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये : बाबू कवळेकर

Published On: Feb 22 2019 7:07PM | Last Updated: Feb 22 2019 7:07PM
मडगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारला जनतेचे काहीच देणे घेणे नाही, हे सीआरझेडच्या विषयावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लाखो लोकांचा विरोध पत्करून केवळ पक्ष श्रेष्ठींना खूश करण्यासाठी सरकार सीआरझेडची मर्यादा दोनशे मीटर वरून पन्नास मीटर करू पहात आहे. सरकारच्या या कृतीमुळे राज्यातील समुद्र किनाऱ्यावर काँक्रीटचे जंगल निर्माण होणार असून मच्छिमारी बांधवांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पहाता सीआरझेडची अधिसूचना ताबडतोब मागे घ्यावी, असे आवाहन विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी केले आहे.

मडगावात दक्षिण गोवा काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस आणि माजी अध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते. सीआरझेडची मर्यादा दोनशे मीटर वरून पन्नास मीटरवर आणण्यास लाखो लोकांनी विरोध केलेला आहे. लोकांनी स्वाक्षऱ्या करून आपला विरोध दाखवून दिलेला आहे. असे असताना सुद्धा सरकार केवळ पक्षश्रेष्टीना खुश करण्यासाठी लोकांचा बळी देण्यास तयार झाले आहे, अशी टीका कवळेकर यांनी केली आहे.

लोकांना त्रास झाला तरी चालेल पण अधिसूचना मागे घेणार नसल्याची भूमिका सरकार मांडत आहे. सरकारच्या या एकतर्फी निर्णयामुळे मच्छिमारी बांधव आणि पारंपरिक मासळी व्यवसायिक संकटात सापडणार आहेत,  असे कवळेकर म्हणाले.