होमपेज › Goa › गोमेकॉ, कला अकादमीची कँटिन्स बंद 

गोमेकॉ, कला अकादमीची कँटिन्स बंद 

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 1:16AMपणजी : प्रतिनिधी

अन्‍न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी गोमेकॉतील तीन तसेच कला अकादमीच्या एका कँटिनवर सोमवारी छापा टाकून पाहणी केली. अन्‍नपदार्थांच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात नसल्याचे व आरोग्यास अपायकारक स्थिती आढळून आल्याने सदर कँटिन बंद करण्याचा आदेश खात्यातर्फे देण्यात आला आहे, असे अन्‍न व औषध प्रशासनच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी सांगितले. गोमेकॉच्या परिसरात रुग्णांसाठी आणि नातेवाइकांसाठी असलेल्या तीन खासगी कँटिनमध्ये अस्वच्छता असल्याचे प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी याआधीही केलेल्या पाहणीत आढळून आले होते. या तिन्ही कँटिनची सोमवारी अचानक फेरतपासणी केली असता   कँटिनच्या व्यवस्थेत कसलाही बदल झालेला नसल्याचे अधिकार्‍यांना आढळून आले. 

शासनाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी गोमेकॉच्या ओपीडी कँटिन, कॉलेज कँटिन आणि तळमजल्यावरील कँटिनला भेट दिली. यावेळी सर्व कँटिनमधील किचनच्या भिंतीवर पाली, झुरळे, मुंग्या फिरत असल्याचे दिसून आले. फ्रिजमध्ये कोणत्याही पदार्थावर आवरण घालण्यात आले नव्हते, असेही आढळून आले. बनवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये रंगाचा वापर करण्यात आल्याचे आढळले. कँटिनच्या किचनच्या खिडक्यांना जाळी अथवा एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आले नव्हते. समोसे बनवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या पोळ्या अस्वच्छ 
पिशव्यांत साठवल्याचे दिसून आले. खोलीत     

भाज्या उघड्यावर कापण्यात येत होत्या. कुठेही वॉटर फिल्टर सुरू  नव्हता. भिंतीवरील रंगाचे तुकडे तसेच कोळीष्टके अन्नात पडत असून जमीनही अस्वच्छ होती. कामगारांचे कपडे, चादरी, चपला किचनमध्ये ठेवण्यात येत असल्याचे आढळून आले.  गोमेकॉतील तिन्ही कँटीनना पुढील सुधारणा न होईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश खात्यातर्फे देण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. 
गोवा कला अकादमीच्या कँटीनमध्येही अस्वच्छता आणि आरोग्याला अपायकारक, असे वातावरण असल्याचे एफडीएच्या अधिकार्‍यांना सोमवारी पाहणीवेळी दिसून आले. कँटीनच्या भिंती तसेच जमीन ओलसर व तेलमिश्रीत असल्याचे तसेच गॅस स्टोव्ह आणि भाज्या कापण्याचे ठिकाणही  अस्वच्छ असल्याचे आढळले. या प्रकरणी कँटीन चालकाला  नोटीस बजावण्यात आली असून सुधारणा होईपर्यंत व्यवहार बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचे एफडीए संचालक सरदेसाई यांनी सांगितले. 

Tags :Gomec, Art Academy closed, food and drugs raid, goa news