Wed, May 27, 2020 18:49होमपेज › Goa › गोमंतकीयांनी राहुल गांधींचे हात बळकट करावेत

गोमंतकीयांनी राहुल गांधींचे हात बळकट करावेत

Published On: Apr 13 2019 1:54AM | Last Updated: Apr 13 2019 1:41AM
मडगाव : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात काँग्रेस सरकार सत्तेत येणार असून गोव्यातील जनतेने काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना निवडून राहुल गांधी यांचे हात बळकट करावेत,असे आवाहन काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी केले.केपे नगरपालिका आणि आवेडे पंचायतीच्या कोपरा बैठकीत ते बोलत होते.

केपेत आयोजित  कोपरा बैठकीत सुमारे चारशे काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर,दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस,माजी अध्यक्ष सुभाष फळदेसाई, केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, उपनगराध्यक्ष चेतन हळदणकर, फिलू डिकोस्टा, राऊल परेरा, मॅन्युअल कुलासो, लुईजा कार्व्हालो, जिल्हा पंचायत सदस्य मीनाक्षी गांवकर, सरपंच अलुली अफोंसो व इतर उपस्थित होते. खाणबंदी, नोटा बंदी, जीएसटी अशा नवनवीन त्रासदायक निर्णयांमुळे सामान्य लोक मेटाकुटीला आलेले आहेत.रोजगाराचा विषयसुद्धा ऐरणीवर आलेला आहे, असे सार्दीन म्हणाले. खाण बंदी मुळे लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली असून जीएसटीचा फटका सामान्य लोकांना आणि लहान व्यवसायिकांना बसलेला आहे. महागाई, सीआरझेड अशा विविध समस्या गोव्याला भेडसावत आहेत.केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर गोव्यातील सर्व समस्या सोडवल्या जातील, असे आश्‍वासनही सार्दिन यांनी दिले. 

विरोधी पक्ष नेते कवळेकर यांनी सांगितले, की  देशातील सामान्य लोकांचे विषय सोडविण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रयत्न चालवले आहेत.राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी दक्षिण गोव्यातून अनुभवी उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना निवडून देणे गरजेचे आहे.केंद्रातील भारतीय जनता पक्ष लोकांना खोटी आश्‍वासने देऊन पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे.

मागच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार, असे सांगितले होते.निवडून आल्यानंतर एका महिन्यात खाणींचा विषय सोडवू,राज्याला विशेष राज्याचा दर्जा देऊ,असेही त्यांनी जाहीर केले होते.ही सर्व आश्‍वासने हवेत विरल्याचे  कवळेकर म्हणाले.लोकांचा विरोध असताना सीआरझेडची मर्यादा दोनशे मीटर्सवरून कमी करून पन्नास मीटर्स करण्यात आली.भाजप च्या खासदारांची दखल केंद्रात घेतली जात नाही आणि त्यामुळे येथील खासदारांना पंतप्रधानांच्या भेटीची वेळही  मिळत नाही, अशी टीका कवळेकर यांनी  केली.