Mon, May 25, 2020 12:29होमपेज › Goa › परराज्यातील गोमंतकीय विद्यार्थ्यांनी परतीसाठी अर्ज करावेत

परराज्यातील गोमंतकीय विद्यार्थ्यांनी परतीसाठी अर्ज करावेत

Last Updated: Apr 26 2020 1:02AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

परराज्यात शिक्षणासाठी गेलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, त्यांना राज्यात परतायचे असल्यास ते जिल्हाधिकार्‍यांकडे रविवारपासून (दि.26) अर्ज करू शकतात. राज्याच्या सीमेवर पोचताच त्यांना क्वारंटाईन करुन त्यांची कोरोना चाचणी केली जाईल व त्यानंतर घरी पाठवण्यासंदर्भात निर्णय होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पालिका, पंचायत मार्केटच्या आवाराबाहेरील दुकाने खुली करण्यास परवानगी आहे. मात्र, त्यांनी निहित अंतर ठेवणे, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांची दुकाने 3 मेपर्यंत बंद ठेवली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राज्यातील अनेकजण विदेशात कामानिमित तसेच शिक्षणासाठी गेले आहेत. या लोकांना मायदेशी परतण्याची इच्छा असून त्यांचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडला जाईल. त्याचबरोबर परराज्यातदेखील अनेक गोमंतकीय विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना गोव्यात परतायचे असल्यास ते जिल्हाधिकार्‍यांकडे परवानगी मागण्यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांनी आपल्या खर्चाने राज्याच्या सीमेपर्यंत यावे. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करुन त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. या चाचणी अहवालानंतरच त्यांना घरी पाठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. त्यामुळे परराज्यात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी चिंता करु नये, असे त्यांनी सांगितले. 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार पालिका, पंचायत मार्केटच्या आवाराबाहेरील दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मद्याची घाऊक तसेच किरकोळ दुकाने बंदच असतील. राज्यात 144 कलम लागूच राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मारेला डिस्कव्हरी तसेच आंग्रीया या जहाजांवरील गोमंतकीय खलाशांची कोवीड चाचणी करण्यात आली असून सर्व जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, असेही त्यांनी सांगितले.