Wed, Jul 08, 2020 12:32होमपेज › Goa › सुवर्णमहोत्सवी ‘इफ्फी’ आजपासून

सुवर्णमहोत्सवी ‘इफ्फी’ आजपासून

Last Updated: Nov 20 2019 1:47AM
पणजी : प्रतिनिधी
सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन बुधवारी (दि.20) दुपारी 3 वाजता ‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत तसेच केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. महोत्सवाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर व अनेक सिनेकलाकार उपस्थित राहणार आहेत. सुवर्णमहोत्सवी इफ्फीचा प्रारंभ ‘डिस्पाईट द फॉग’ या चित्रपटाने होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथील मनोरंजन संस्थेच्या सभागृहात मंगळवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, इफ्फीत यंदा 76 देशांतील एकूण 300 चित्रपट दाखवण्यात येतील. चित्रपटसृष्टीविषयी माहिती देणारे आठ राज्यांचे स्वतंत्र पॅव्हिलियन इफ्फीत असतील. ‘कॅलिडोस्कोप’ या विभागात जगभरात प्रशंसेला पात्र ठरलेले 20 चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. इफ्फीसाठी आतापर्यंत 9300 प्रतिनिधींची नोंदणी झाली असून त्यातील सुमारे 7 हजार प्रतिनिधींनी कार्ड ताब्यात घेतली आहेत. गतसालाच्या तुलनेत यंदा प्रतिनिधींचे प्रमाण 35 टक्के अधिक आहे. कोकणी भाषेच्या विभागात सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. लघुपटासाठी राष्ट्रीय पातळीवरील 10 पुरस्कारांसाठी 352 आणि गोमंतकीय विभागाच्या 20 पुरस्कारांसाठी 110 स्पर्धक भाग घेणार आहेत. 

उद्घाटन समारंभात ‘आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अ‍ॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री इजाबेल हुपर्ट यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. इफ्फीत इजाबेल हुपर्ट मास्टरक्‍लासदेखील घेणार आहेत. इफ्फीत यंदा फोकस कंट्री रशिया असेल. महोत्सवात एकूण 90 चित्रपटांचे राष्ट्रीय पातळीवर प्रीमियर होणार असल्याचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितले. 

यंदा पेपरलेस टिकेटींग 
देशात पहिल्यांदाच इफ्फीत ‘पेपरलेस टिकेटींग’केले जाणार आहे. चित्रपट पाहण्यासाठी ऑनलाईन अथवा खिडकीवर बुकींग करता येणार असून सदर तिकिटाची माहिती मोबाईल क्रमांक अथवा ईमेलवर प्रतिनिधींना देण्यात येणार आहे. या तिकीट बुकींगची माहिती प्रतिनिधींच्या कार्डवरील बारकोडवर जाणार असून चित्रपटगृहात जाण्याआधी असलेल्या यंत्रावर कार्ड दाखवून थेट प्रवेश घेता येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा यांनी दिली.