Sun, May 31, 2020 16:34होमपेज › Goa › सीएए लागू केल्यास गोव्याचा दुसरा आसाम : पापाध्ये

सीएए लागू केल्यास गोव्याचा दुसरा आसाम : पापाध्ये

Last Updated: Feb 22 2020 1:34AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा
आसाममध्ये सीएएची अंमलबजावणी केल्यानंतर 13 लाख लोकांवर नागरिकत्व गमावण्याची पाळी आली आहे. तसेच त्या कायद्यामुळे लोकांवर राष्ट्रीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कठीण प्रसंग आलेले आहेत. गोव्यात सीएए लागू केल्यास गोव्याचा दुसरा आसाम होण्याचा इशारा आसाममधील वकील ए. एस. पापाध्ये यांनी शुक्रवारी येथे दिला.

येथील आझाद मैदानावर सीएएविरोधी नागरिक मंचाने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन केले होते. काऊन्सिल फॉर सोशल जस्टिस अँड पीस, गोवा कॅथलिक संघटना, पीपल्स अगेन्स्ट सीएए, एनआरसी व एनपीआर संघटना यांनी या सभेला पाठिंबा दिला होता. या सभेत अ‍ॅड. पापाध्ये बोलत होते.

देशात केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी हे कायदे गरिबांसाठी धोक्याचे आहेत. या कायद्यांमुळे देशातील अनेक नागरिकांवर नागरिकत्व गमावण्याची पाळी येणार आहे. सरकारने हे सर्व कायदे रद्द करावेत अन्यथा सरकारविरोधी आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा ठरावही या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. केंद्र सरकार जोपर्यंत हे सर्व कायदे रद्द करीत नाही, तोपर्यंत नागरिकांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा व जनगणनेसाठी माहिती देऊ नये, असा ठरावही सभेत मंजूर करून घेण्यात आला. 

अ‍ॅड. पापाध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने आसाममध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू केल्यानंतर हजारो लोकांना भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. आसामचे लोक गेली चाळीस वर्षे या समस्येने ग्रासलेले आहेत. देशभरात सर्वत्र हा कायदा लागू करण्याचा सरकारचा कुटिल डाव आहे. सरकारला गोव्यातील लोकांनी वेळीच विरोध केला नाही, तर आसामनंतर गोव्यातील लोकांवरही नागरिकत्व गमावण्याची पाळी येणार आहे .

भारताला इंग्रजांकडून 1947 साली स्वातंत्र्य मिळाले होते. तर गोव्याला पोर्तुगीजांकडून 1961 साली स्वातंत्र्य मिळाले होते. केंद्र सरकारने सीएए, एनपीआर व एनआरसी हे कायदे लागू केल्यास जनतेला पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा देणे भाग पडणार आहे, असे दादू मांद्रेकर यांनी सांगितले.

देशात व राज्यात सत्तेवर असलेले भाजपचे सरकार मनमानी कारभार करीत असून लोकशाहीच्या विरोधात निर्णय घेताना दिसत आहे. सरकारची धोरणेच चुकीची ठरत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणुकीच्या वेळी भाजपाला योग्य धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे आर्थुर डिसोझा यांनी सांगितले.

वकील, सामाजिक व अन्य क्षेत्रांतील नागरिकांनी सीएएच्या विरोधात आपली मते मांडली. या सभेला सुमारे 8 हजारांहून अधिक लोकांची गर्दी होती. आझाद मैदान लोकांच्या गर्दीने भरल्याने मैदानाच्या सभोवताली उभे राहून लोकांनी सभेला उपस्थिती लावली होती.

या सभेचे निमंत्रक प्रकाश कामत, रामा काणकोणकर, यांच्यासह व्हिक्टर ब्रागांझा, आसामहून आलेले वकील ए. एस. पापाध्ये, ज्युलियो आगियार, दादू मांद्रेकर, आयेशा रैना, राहुल सोनपिंपळे, रामकृष्ण जल्मी, अ‍ॅड. नबिला हसन, आसिफ हुसैन, आल्बेर्टीना आल्मेदा, प्रसन्न ढगे, आर्थुर डिसोझा आदींनी सीएएच्या विरोधात या सभेत मते मांडली.