Sat, Sep 21, 2019 07:18होमपेज › Goa › गोवा लवकरच ‘लॉजिस्टिक हब’

गोवा लवकरच ‘लॉजिस्टिक हब’

Published On: Oct 22 2018 1:44AM | Last Updated: Oct 22 2018 1:44AMफोंडा : प्रतिनिधी

गोवा हे दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाचे राज्य असून व्यापार-उद्योग आणि रोजगाराला प्राधान्य देण्यासाठी गोव्याला ‘लॉजिस्टिक हब’ अर्थातच वाणिज्य दळणवळण आणि वाहतूक केंद्र बनवण्याचे सरकारने ठरवले आहे, असेे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले.

कुंडई येथे नामांकित उद्योग समूहांतर्फे ‘ग्रीन बिल्डिंग सेंटर’चे उद्घाटन सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. गोव्यात उत्पादित होणार्‍या शेतमालाची निर्यात करण्यासाठीची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार असून उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘स्टार्टअप’ कार्यक्रम येत्या 7 डिसेंबरला   होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सुरेश प्रभू म्हणाले, गोवा एक निसर्गसंपन्न प्रदेश आहे. या राज्यातील निसर्गसंपन्नता अबाधित ठेवून विकास झाला पाहिजे. साधनसुविधा तयार करण्यासाठी कुठेतरी आपल्याला तडजोड करावी लागते, पण ती कुठपर्यंत करावी, याचाही विचार व्हायला हवा. जगात नैसर्गिक स्रोत हे मर्यादित आहेत. लोकसंख्या वाढत चालली आहे. 

त्यामुळे वाढणार्‍या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी साधनसुविधांचा मर्यादित वापर करून नियोजन करणे महत्त्वाचे आहे. मुळात साधनांचा योग्य आणि पुनर्वापर व्हावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. गोवा राज्य हे दळणवळणाच्या क्षेत्रात रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीशी जोडले गेले आहे. त्यामुळेच या राज्यात वाणिज्य व्यवहार योग्यरीत्या मार्गी लावणे शक्य असून लॉजिस्टिक हबद्वारे गोव्याचा कायापालट घडू शकतो. केंद्र सरकारने सेवा केंद्रासाठी पाच हजार कोटी रुपये देशभरासाठी ठेवले आहेत. त्यातील एक वाटा गोव्यासाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, गोव्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विकास केला आहे. राज्याचे योग्य नियोजन करताना असलेल्या साधनसुविधा योग्यरीतीने कशा वापरता येतील, याकडे लक्ष द्यायला हवे. तंत्रज्ञान बदलत आहे. चांगल्याचा वापर करताना कचर्‍याचे नियोजन करून ‘स्वच्छ भारत’ घडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. यावेळी नीरज आखुरी, गौरव खंवटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अनिल खंवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आकाश खंवटे यांनी आभार मानले. 

गोव्याच्या शेतमालाची लवकरच निर्यात

गोव्यातील शेतमाल बाहेरील देशात निर्यात करण्यासाठीची कार्यवाही लवकरच करण्यात येणार आहे. गोव्यात पिकणारा भाजीपाला, उपलब्ध असलेली फळे यांची निर्यात करून गोव्यातील शेतकर्‍यांना चांगले दिवस यावेत, यासाठी गोव्यातील शेतमाल निर्यात करण्यात येणार असल्याचे वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.