Wed, May 27, 2020 12:40होमपेज › Goa › गोवा : '...अन्यथा युरोपमधून आमच्या शवपेट्या येतील'

गोवा : '...अन्यथा युरोपमधून आमच्या शवपेट्या येतील'

Last Updated: Apr 21 2020 7:01PM
मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात उतरण्यासाठी परवानगी देणार या आशेवर गेल्या चाळीस दिवसांपासून राज्य सरकारने आम्हाला झुलवत ठेवलेले आहे. आज बुधवारी (दि. २१) हे जहाज पुन्हा युरोपसाठी रवाना होणार असून त्यापूर्वीच आम्हाला उतवरले न गेल्यास युरोपमधून आमचे मृतदेह आणावे लागतील, अशी कळकळीची विनंती मुंबईत अडकून पडलेल्या मारेला डिस्कव्हरी या जहाजावरील गोमंतकीय खलाशांनी केली आहे.

मारेला डिस्कव्हरी जहाजावर असलेल्या १४६ भारतीय खालांशा पैकी ६६ गोमंतकीय खलाशांनी खास व्हिडीओ प्रसारित करून गोवा सरकारने त्याना ताबडतोब गोव्यात येण्याची अनुमती द्यावी अन्यथा हे जहाज युरोपात गेल्यास गोव्यात आमच्या शवपेट्या आणाव्या लागतील अशी भीती व्यक्त केली आहे. गेले चाळीस दिवस आम्ही भारतात आहोत पण अजून गोवा सरकारने आम्हाला गोव्यात आणण्यासाठी कोणतीही पावले उचललेली नाहीत. बुधवारी सायंकाळी हे जहाज पुन्हा युरोपसाठी रवाना होणार असून त्याठिकाणी कोरोनाची काय स्थिती आहे हे सर्वांना माहिती आहे. आम्हाला पुन्हा युरोपात नेल्यास कोरोनाची लागण होण्याची शंभर टक्के शक्यता आहे, अशी भीती खलाशांनी व्यक्त केली आहे. युरोपवरून कोरोनाची लागण होऊन गोव्यात आल्यावर ते सर्वांसाठी त्रासदायक ठरणार आहे आणि ती परिस्थिती हाताळणे सरकारला शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया खलाशांनी व्यक्त केली आहे.