Wed, Jul 08, 2020 12:09होमपेज › Goa › ‘हागणदारीमुक्‍ती’बाबत गोव्याची इतर राज्यांपेक्षा स्थिती चांगली : मुख्यमंत्र

‘हागणदारीमुक्‍ती’बाबत गोव्याची इतर राज्यांपेक्षा स्थिती चांगली : मुख्यमंत्र

Published On: Sep 07 2019 2:02AM | Last Updated: Sep 07 2019 12:19AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यातील 95 टक्के गोमंतकीयांकडे शौचालयाची व्यवस्था आहे. ज्या भागात वैयक्‍तिक शौचालय नसेल तिथे सावर्जनिक शौचालयांची व्यवस्था शासन लवकरच करणार आहे. ‘हागणदारीमुक्‍त’ योजनेबाबत अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्याची स्थिती खूपच अव्वल असल्याने राज्य ‘हागणदारीमुक्‍त’ जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना दिली. 

गोवा हागणदारीमुक्‍त राज्य झाल्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ते म्हणाले की, गोमंतकीयांकडे 100 टक्के शौचालय असल्याचा दावा सरकारने कधीच केलेला नाही. राज्यात 95 टक्के लोकांकडे शौचालयांची व्यवस्था आहे. सार्वजनिक शौचालये जिथे नाहीत, तिथे ती पुरवण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. आणखी कुठे शौचालय बसवण्याची मागणी झाली तर तीही राज्य सरकार पूर्ण करणार आहे. 

अन्य राज्ये ‘हागणदारीमुक्‍त’ जाहीर होत आहेत. त्यांच्या मानाने राज्यातील स्थिती खूपच चांगली असल्याने गोव्याला ‘हागणदारीमुक्‍त’ घोषित करणे यात काहीच धक्कादायक नाही. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनीही सावंत यांना दुजोरा देताना सांगितले की, पूर्वी रस्त्याच्या बाजूला अथवा अन्य उघड्या ठिकाणी लोक शौचास बसत 

असल्याचे चित्र दिसत होते. आता अनेक शौचालये उभारण्यात आली असून तशी स्थिती आढळून येत नाही. अनेक ठिकाणी भाटकारांकडून मुंडकारांना शौचालय बांधण्यासाठी ना हरकत परवाना दिला गेला. तर काही मुंडकारांकडे शौचालयाच्या बांधकामांसाठी पुरेशी जागाही नाही. असे प्रत्येकांसाठी सरकार थांबत राहिले तर राज्य कधीच ‘हागणदारीमुक्त’ होणे शक्य नाही.