Mon, May 25, 2020 13:12होमपेज › Goa › देशाच्या आर्थिक विकासात गोव्याचा मोठा वाटा : अमित शहा

देशाच्या आर्थिक विकासात गोव्याचा मोठा वाटा : अमित शहा

Published On: Aug 23 2019 1:29AM | Last Updated: Aug 23 2019 1:29AM

पश्चिम विभागीय परिषदपणजी : प्रतिनिधी

देशाच्या अर्थव्यवस्थेत पश्चिम क्षेत्राचा मोठा वाटा आहे. ‘सकल देशांतर्गत उत्पन्ना’त (जीडीपी) सुमारे 24 टक्के तर एकूण निर्यातीत पश्चिम क्षेत्राचा वाटा 45 टक्के आहे.  या राज्यांनी यशस्वीरित्या सहकारी क्षेत्राला चालना दिली आहे.  साखर, कापूस, भूईमूग आणि मासे यांची निर्यात या भागातून जास्त आहे. देशाच्या आर्थिक विकासात या राज्यांचा मोठा वाटा असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. 

केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या अध्यक्षतेखाली  पश्चिम विभागीय परिषदेच्या 24 व्या बैठकीचे गुरूवारी दोनापावला - पणजी येथील एका पंचतारांकीत हॉटेलात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गोवाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच  गुजरात या राज्यांचे आणि दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विविध खात्याचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख  तसेच केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती.  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी जम्मू-काश्मीर राज्यासंबंधी कलम- 370 आणि 35-अ बाबत घेतलेल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासाचा मार्ग यामुळे प्रशस्त होईल, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी मांडलेल्या ठरावाला गोवा आणि गुजरात राज्याचे मुख्यमंत्री तसेच दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीच्या प्रशासकीय प्रमुखांनी अनुमोदन दिले आणि निर्णयाचे स्वागत केले. 

महाराष्ट्र सरकारच्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेचा बृहद आराखडा, बँकींग सुविधेपासून वंचित असलेल्या गावांमध्ये बँकांच्या शाखा उघडणे, थेट लाभार्थी योजनेशी संबंधित पोर्टलच्या माध्यमातून माहितीचे संकलन, मच्छिमारांना क्यूआर कोड प्रणालीचे ओळखपत्र आणि पोस्को कायद्यातील तरतुदींविषयी तपशीलवार चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली.