Tue, May 26, 2020 07:40होमपेज › Goa › गोवा : शिरोड्यातून भाजपचे सुभाष शिरोडकर विजयी

गोवा : शिरोड्यातून भाजपचे सुभाष शिरोडकर विजयी

Published On: May 23 2019 2:20PM | Last Updated: May 24 2019 2:27AM
मडगाव : प्रतिनिधी

शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीत मगोपचे उमेदवार तथा माजी मंत्री दीपक ढवळीकर यांचा निसटता पराभव झाला आहे. ढवळीकर यांना केवळ ७६ मतांनी पराभूत करुन भाजपचे उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी शिरोडा मतदारसंघात आपले स्थान अबाधीत ठेवले आहे. शिरोडात आपल्याला हरवण्यासाठी पैश्याचा वापर करण्यात आला होता पण शिरोड्याची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडली नाही. हा आपला नव्हे तर आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले आहे.

विजयी उमेदवार सुभाष शिरोडकर यांना १०,६६१ मगोपचे पराभूत उमेदवार दिपक ढवळीकर यांना १०,५८५ मते, तर कॉग्रेसचे महादेव नाईक २४०२, गोवा सुरक्षा मंचचे संतोष सतरकर यांना २८४ आणि आपचे योगेश खांडेपारकर यांना २३१ मते प्राप्त झाली आहेत. तर ३११ मते पोस्टल स्वरूपात पडलेली मते आहेत. तर नोटाच्या मतांची संख्या ३०४ एवढी आहे. शिरोडा मतदारसंघात ७२ मते बाद ठरवण्यात आली आहेत.

विजयी उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी विजयानंतर आपली प्रतिक्रिया देताना हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे सांगितले. शिरोडा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी अपल्यासाठी काम केले आहे. त्याचबरोबर आपल्या जुन्या काँगेसच्या कार्यकर्त्यांनी सुध्दा आपल्यासाठी काम केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना यापूर्वी सुद्धा आपण कमी मतांनी निवडून आलो होतो, असे त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, वीजमंत्री निलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे या सर्वानी आपल्यासाठी काम केले आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार सुभाष शिरोडकर यांनी दिली. शिरोडात पैशाचा पाऊस पाडण्यात आला होता. पण शिरोडामधील जनता भूलली नाही असे शिरोडकर यांनी संगितले.