Mon, May 25, 2020 03:39होमपेज › Goa › गोव्यात भाजप सरकारची आज सत्वपरीक्षा

गोव्यात भाजप सरकारची आज सत्वपरीक्षा

Published On: Mar 20 2019 1:16AM | Last Updated: Mar 20 2019 1:16AM
पणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन आज 20 मार्च) बोलवण्यात आले असून, भाजप सरकार विश्‍वासदर्शक ठराव मांडणार आहे. सकाळी 11.30 वा. अधिवेशनाला प्रारंभ होणार असून आघाडी सरकारचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रिपदाचा ताबा स्वीकारण्याच्या दुसर्‍याच दिवशी अग्‍निपरीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांनी सभापतिपदाचा राजीनामा उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे सादर केला. राजीनामा स्वीकारण्यात आला असून, आज होणार्‍या विधानसभेच्या अधिवेशनात उपसभापती मायकल लोबो हे सभापती म्हणून कामकाज पाहणार आहेत.

40 सदस्यांच्या विधानसभेत सध्या आमदारांची संख्या 36 असून भाजप आघाडीचे 21 आमदार सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आरोपांना सावंत यांना तोंड द्यावे लागणार आहे. भाजप आघाडीचे विधानसभेत पूर्ण बहुमत असल्याने विश्‍वासदर्शक ठराव जिंकण्यात कोणतीही अडचण येणार नाही,असे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दरम्यान,मुख्यमंत्री सावंत यांनी पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पर्वरी येथील मंत्रालयात मंगळवारी  दुपारी 1 च्या सुमारास  मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. आपल्या खुर्ची शेजारील आसनावर पर्रीकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करूनच ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाले.यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, की   भाजप आघाडी सरकार मागील दोन वर्षे पर्रीकर यांनी चांगल्या रीतीने चालवले होते .हेच कार्य पुढील तीन वर्षे आपण पुुढे नेणार आहोत. 

अपूर्ण कामे पूर्ण करण्याला प्राधान्य ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले ,की माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कालावधीत जे प्रकल्प गोव्यात सुरू होते ते लवकरात लवकर पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असेल.समाजातील  तळागाळातील व शेवटच्या माणसापर्यंत सर्व विकासकार्य पोचवण्याचे काम सरकारचे आहे.’अंत्योदय’ तत्त्वानुसार आमचे सरकार या सामान्य माणसांसाठी काम करणार आहे.सरकारच्या सर्व विकास  योजना सर्वसामान्यांपर्यंत  पोहचवण्यावर आम्ही लक्ष देणार आहोत. खाणबंदीवरील समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठीही आपले प्रयत्न असणार आहेत.सभापतिपदावरून थेट मुख्यमंत्रिपद मिळणे ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. राज्यातील लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या तीन जागा भाजपच जिंकणार आहे,असा आपला विश्वास असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. 

शुभेच्छा स्वीकारणार नाही : सावंत

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर आपल्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण आधीचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे आपण जनतेच्या शुभेच्छा स्वीकारणार नसल्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे. आपणही 7 दिवसांचा दुखवटा पाळणार असून राज्यातील लोकांनी शुभेच्छा देण्यासाठी सचिवालयात मुद्दामहून येऊ नये, असे आवाहन आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ट्विटर संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. गोमंतकीयांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात डॉ. सावंत यांनी गोव्याच्या प्रगतीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत राज्यात झालेल्या विकासाची गती भविष्यात वाढेल. तसेच गोव्याच्या विकासाचा आलेख  डॉ. सावंत यांच्या नेतृत्वात उंचावेल, असा  विश्‍वास पंतप्रधानांनी व्यक्‍त केला.