Tue, May 26, 2020 06:08होमपेज › Goa › पाच वर्षांत राज्यात ‘गोसुमं’ पक्षाचे सरकार 

पाच वर्षांत राज्यात ‘गोसुमं’ पक्षाचे सरकार 

Published On: Nov 19 2018 1:00AM | Last Updated: Nov 19 2018 12:24AMपर्वरी : वार्ताहर

गोव्याचे राजकारण सिद्धांतशून्य, तडजोडवादी नेत्यांनी बरबटलेले आहे. राज्यात एकाधिकारशाही चालली आहे. राज्याला योग्य दिशा व नेतृत्वाची गरज आहे. आमच्याकडे तन, मन, धन अर्पण करून काम करणारे कार्यकर्ते आहेत. तीच आमची शक्‍ती आहे. आमचा पक्ष  कोणत्या एका राजकीय पक्षाला लक्ष्य करीत नाही. जे लोक स्वच्छ चारित्र्यवान राजकारणाच्या शोधात आहेत, त्यांना आम्ही राजकीय पर्याय उपलब्ध करत आहोत. येणारी मध्यवर्ती निवडणूक ही आमच्यासाठी उपांत्य फेरी आहे. त्यानंतर येणार्‍या पाच वर्षात आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असून आमच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे मत गोवा सुरक्षा मंचात प्रवेश केलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्‍त केले.  

पर्वरी येथे गोवा सुरक्षा मंच या राजकीय पक्षात रविवारी अधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वेलिंगकर बोलत होते. व्यासपीठावर उदय भेंब्रे, पक्षाचे अध्यक्ष आत्माराम गावकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, अरविंद भाटीकर, गोविंद देव, स्वाती केरकर, किरण नायक, डॉ. प्रकाश कुराडे, संदीप पाळणी, गणेश गावकर, विनायक नाईक आदी उपस्थित होते. 

वेलिंगकर म्हणाले, की आयुष्यातील अर्धे अधिक आयुष्य आपण समाजकारणात घालविले. मात्र, आयुष्यात कधी तरी राजकीय प्रवास करावा लागेल असे वाटले नव्हते, काळाची गरज म्हणून राजकारणात आलो आहे. समाज चांगल्या राजकारण्याच्या प्रतीक्षेत आहे. समाजात तत्त्वाचे राजकारण रुजविणे गरजेचे आहे. आम्ही गेल्या निवडणुकीत पाच मतदारसंघात साडेदहा हजार मते घेतली. त्यावेळी कोणालाही आमिषे दाखविली नाहीत. आजही विचाराधिष्ठ राजकारणाला वाव आहे. अजून समाजात संवेधनशीलता जिवंत आहे. योग्य पर्याय दिला तर जनता तो स्वीकारण्यास तयार आहे. असा त्याचा अर्थ होतो, आमचा पक्ष तो देण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांचे अनुदान बंद करणार, या मुद्यावर आम्ही ठाम असणार आहे. त्या प्रश्‍नावर कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य केली जाणार नाही.  राजकीय पक्ष असल्याने कॅसिनो, अमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय, खाण व्यावसायिकांचे प्रश्‍न, सामाजिक प्रश्‍न आम्ही हाती घेणार आहोत. रोजगार निर्मितीवरही आमचा भर असणार आहे. निखळ समाजसेवा आणि समाजहित ही आमची प्रेरणा आहे. आम्ही आमच्या तत्त्वाशी तडजोड करणार नाही. 

उदय भेंबे्र म्हणाले, की  गोव्याचे जितके नुकसान अन्य मुख्यमंत्र्यांच्या कालावधीत झाले नाही तितके पर्रीकर यांच्या कालावधीत झाले आहे.   सरकारने सत्तेसाठी वाट्टेल ते करा व सत्ता मिळावा, हे तत्त्व अवलंबले आहे.हे चित्र बदलण्याची गरज आहे.

गोव्याला या अराजकतेपासून वाचवायचे असेल तर वेलिंगकर यांच्यासारख्या स्वच्छ, चारित्र्यवान नेत्यांनी राजकारणात येण्याची गरज आहे. ती उणीव आज भरून निघाली आहे. येणार्‍या काळात वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा सुरक्षा मंच राजकारणाला योग्य दिशा देईल यात शंका नाही. स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी सांगितले.

आम्हाला भावी मुख्यमंत्री म्हणून वेलिंगकर हे येणार्‍या काळात पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते प्रशासनाला योग्य दिशा देणार आहेत, असे अरविंद भाटीकर यांनी सांगितले. किरण नायक यांनी स्वागत व ओळख करून दिली.आत्माराम गावकर यांनी प्रास्ताविक केले. विनय नाईक यांनी सूत्रसंचालन केले. 

गोसुमं पक्ष भरारी घेणार

गोव्यातील राजकारणासाठी सुभाष वेलिंगकर सारख्या स्वच्छ चारित्र्यवान, नेत्याचे नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोसुमं पक्ष उंच भरारी घेईल. या पुढे पक्षातीच्या सर्व धुरा ते सांभाळतील, असे जाहीर करतो, असे गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आत्माराम गावकर यांनी सांगितले.