Wed, May 27, 2020 18:08होमपेज › Goa › गोवा विधानसभेचे कामकाज पाचवेळा तहकूब

गोवा विधानसभेचे कामकाज पाचवेळा तहकूब

Published On: Jul 20 2018 1:15AM | Last Updated: Jul 20 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनयुक्‍त मासळीवर  चर्चा करा, अशी मागणी करून   विरोधी पक्ष काँग्रेसच्या आमदारांनी   गोवा विधानसभेच्या पावसाळी  अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  गदारोळ  माजवल्याने सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना कामकाज पाचवेळा तहकूब करावे लागले. काँग्रेसच्या आमदारांनी चालवलेल्या सततच्या गोंधळामुळे दुपारी 2.30 वाजता पाचव्यांदा कामकाज तहकूब करताना   सभापतींनी   शुक्रवारी (दि.20) सकाळी  11.30 वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज स्थगित केले. 

मासळी हा गोमंतकीयांच्या आहाराचा मुख्य घटक असून घातक फार्मेलिनयुक्‍त मासळीबाबत जनतेमध्ये भीती असल्याने त्यावर  सभागृह  कामकाजाच्या सुरुवातीलाच चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी सकाळी 11.30 वाजता  विधानसभेचे कामकाज सुरू होताच  सभापती डॉ. सावंत यांच्याकडे केली.

सभागृहाचे कामकाज तहकूब करून केवळ फार्मेलिनयुक्‍त मासळीवर चर्चा करावी, असे काँग्रेसच्या सर्व 16 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिल्याचेही यावेळी कवळेकर यांनी सांगितले. परंतु प्रश्‍नोत्तर तास महत्वाचा असल्याने  तसेच काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, भाजप आमदार निलेश काब्राल यांनी फार्मेलिन विषयावर  लक्षवेधी सूचना मांडल्याने त्यावेळी  या विषयावर चर्चा करू. तुम्हाला बोलण्याची संधी मिळेल, असे सांगून सभापती डॉ. सावंत यांनी विरोधी पक्षाची ही मागणी फेटाळून लावली.

परंतु विरोधी पक्षनेते कवळेकर  तसेच काँग्रेसच्या अन्य आमदारांनी  चर्चेची मागणी कायम ठेवली. यावेळी  गोंधळातच आमदार राजेश पाटणेकर यांनी प्रश्‍न विचारला व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  या प्रश्‍नाला  उत्तर दिले. 

फार्मेलिनप्रश्‍नी सरकार गंभीर  नसल्याचा आरोप करून प्रश्‍नोत्तर तासापूर्वी चर्चा करा, अशी मागणी  विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी लावून धरल्याने सभापतींनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. कामकाज सुरू होताच पुन्हा विरोधी पक्षाने आपली मागणी लावून धरल्याने सभापतींनी दुसर्‍यांदा सभागृहाचे कामकाज दुपारी 12.30 वाजेपर्यंत तहकूब केले. 

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु होताच काँग्रेसने मागणी कायम ठेवल्याने तिसर्‍यांदा कामकाज 12.45 पर्यंत तहकूब केले. शोक प्रस्तावावेळीदेखील काँग्रेसने गोंधळ कायम सुरुच ठेवला. मासळी माफीया बाजारातून विष पसरवत आहेत.   जनतेच्या आरोग्याशी संबंधित हा महत्वाचा विषय आहे. परंतु सरकार  या मुद्द्यावर चर्चा करू  इच्छित नसल्याचा आरोप यावेळी काँग्रेसचे आमदार  लुईझिन फालेरो यांनी केला.

काँग्रेस आमदार कामकाज सुरळीत चालवण्यास देत नसल्याचे पाहून सभापती डॉ.सावंत यांनी  चौथ्यांदा म्हणजे दुपारी 2.30 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. परंतु   2.30 वाजता सभागृहाचे कामकाज सुरु होताच  काँग्रेसने  फार्मेलिनप्रश्‍नी आताच चर्चा करा, अशी मागणी पुन्हा एकदा करुन गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने सभापतींना पाचव्यांदा  सभागृहाचे कामकाज शुक्रवारी (दि.20) सकाळी 11.30 वाजेपर्यंत तहकूब केले. 

जेवणात ‘नुस्ते’ नको रे बाबा..!

माशांमध्ये ‘फार्मेलिन’ आढळण्याच्या प्रकाराचा आमदारांनीही धसका घेतला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, भोजनाच्या सुट्टीत बहुतांश आमदार- मंत्र्यांनी मासळीच्या जेवणाला हातही लावला नाही. सर्व आमदारांना दुपारच्या जेवणासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली असून अनेक हिंदू आमदारांनी गुरुवार असल्याचे सांगून शाकाहारी जेवण पसंत केले. तर काही आमदारांनी जेवणात थोड्या प्रमाणात मासळी घेतली होती. मात्र, एका आमदाराने जेवण पुरवणार्‍या कंत्राटदाराकडे मासळी कुठून आणली याची चौकशी केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

‘फार्मेलिनयुक्‍त मासळी’वर मुख्यमंत्र्यांचे सोमवारी उत्तर : सभापती 

विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या फार्मेलिनयुक्‍त मासळी संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी उत्तर देतील व या विषयावर चर्चेसाठी कामकाजात अधिक वेळ देण्यात येईल, असे सभापती प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. फार्मेलिनयुक्‍त मासळी विषयावर चर्चेची मागणी केल्यानंतर  सभापतींनी हा निर्णय सुनावला. यावर सभापतींकडून विरोधी पक्षाचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप  लुईझिन फालेरो यांनी केला.