Wed, May 27, 2020 17:03होमपेज › Goa › गोवा : उपमुख्यमंत्री सरदेसाईंचा भाजपच्‍या सावईकरांना पाठिंबा 

गोवा : उपमुख्यमंत्री सरदेसाईंचा भाजपच्‍या सावईकरांना पाठिंबा 

Published On: Apr 18 2019 4:42PM | Last Updated: Apr 18 2019 4:42PM
मडगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक असताना गोव्‍याचे उपमुख्यमंत्री व गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी आपल्या नगरसेवकांना भाजपचे लोकसभा उमेदवार नरेंद्र सावईकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राज्यसभा खासदार तसेच भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या समवेत पार पडलेल्या बैठकीत सरदेसाई यांनी सावाईकर यांना पाठिंबा  देण्याचे मान्य केले.

फातोर्डा येथील एका हॉटेलात भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई आणि त्यांच्या अकरा नगरसेवकांची आणि गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मडगाव पालकेच्या नगराध्यक्षा बबिता आंगले, उपनगराध्यक्ष टिटो कार्डोस व इतर उपस्थित होते. सरदेसाई यांच्या आदेशाची त्यांचे आकारही नगरसेवक वाट पाहत होते. सरदेसाई यांनी त्यांना सावईकर यांच्यासाठी काम कारण्याची सूचना न दिल्याने त्यांच्या गटातील एकाही नगरसेवकाने प्रचारात सहभाग घेतला नव्हता. अखेर निवडणुकीला अवघे पाच दिवस असताना भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सरदेसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. नंतर सरदेसाई यांनी हा निर्णय घेतला. गोवा फॉरवर्ड एनडीएचा घटक असल्याने भाजपचे उमेदवार नरेंद्र सावईकर याना सहकार्य करणे गरजेचे आहे, असे सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

सरदेसाई यांनी यावेळी भाजपचे नाव घेण्याचे टाळले. पण एनडीएचे घटक म्हणून सावाईकर यांना पाठिंबा देण्याचे त्यांनी मान्य केले. गोवा फॉरवर्डच्या निर्णयावर विनय तेंडुलकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. सरदेसाई यांच्या या निर्णयामुळे गोवा फॉरवर्डचे नगरसेवक आणि कार्यकर्ते नरेंद्र सावईकर यांच्यासाठी काम करणार आहेत, असा विश्वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला.  

लोकांनी यावेळी तेंडुलकर यांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित केले. शनिवारी लोहिया मैदानावर होत असलेल्या भाजपच्या  जाहीर सभेत उपमुख्यमंत्री सदरदेसाई आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत असा विश्वास तेंडुलकर यांनी व्यक्त केला. शनिवारी ख्रिश्चन धर्मीयांचा धार्मिक दिवस असल्याने गोवा फॉरवर्डच्या काही कार्यकर्त्यांनी त्यादिवशी लोहिया मैदानावर बैठकीला येऊ शकणार नसल्याची अडचण व्यक्त केली.