Thu, Jul 02, 2020 13:42होमपेज › Goa › गोवा डेअरीकडून गायीच्या दुधाला प्रतिलिटर २ रुपये दरवाढ

गोवा डेअरीकडून गायीच्या दुधाला प्रतिलिटर २ रुपये दरवाढ

Published On: Jul 31 2019 1:42AM | Last Updated: Jul 31 2019 1:42AM
फोंडा : प्रतिनिधी 

गायीचे दूध गोवा डेअरीला पुरवणार्‍या दूध व्यावसायिकांना आता लिटरमागे किमान 2 रुपये दरवाढ मिळणार आहे. ही दरवाढ दुधाच्या स्निग्धतेनुसार वाढणार असून, सर्वाधिक साडेतीन रुपयेपर्यंत लिटरमागे दूध व्यावसायिकाला मिळणार आहेत. गोवा डेअरीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ येत्या 1 ऑगस्टपासून देण्यात येणार आहे. 

गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गोवा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. सी. सावंत उपस्थित होते. महिन्याभरापूर्वी गोवा डेअरीने म्हशीचे दूध देणार्‍या दूध व्यावसायिकांसाठी अशाचप्रकारे दोन रुपयांची वाढ केली होती. त्यावेळी दूध व्यावसायिकांनी सर्वच दुधाला ही दरवाढ द्यावी, अशी मागणी करून उपोषण आंदोलनही छेडले होते. त्यावेळी उपोषणकर्त्यांना गोवा डेअरीने दूध दरवाढीचे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. 

गायीच्या दुधाला दरवाढ दिल्यामुळे साधारण 80 टक्के दूध व्यावसायिकांना त्याचा लाभ होणार असल्याचे गोवा डेअरीच्या व्यवस्थापनाने सांगितले. सध्या 67 हजार लिटर स्थानिक दूध गोवा डेअरीला मिळत असून दूध व्यावसायिकांना दरवाढ दिल्यामुळे गोवा डेअरीला 40 लाख रुपये अतिरिक्त खर्च होणार आहे. मात्र, हा खर्च दूध उत्पादन आणि विक्री वाढवून भागवला जाईल, पण ग्राहकांच्या दूध पाकिटावर मात्र दरवाढ केली जाणार नसल्याचे गोवा डेअरीतर्फे स्पष्ट करण्यात आले.