Tue, May 26, 2020 08:47होमपेज › Goa › गोव्यात जनतेचा कौल काँग्रेसलाच होता

गोव्यात जनतेचा कौल काँग्रेसलाच होता

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील जनतेने काँग्रेसला 2017 च्या विधानसभा निवडणुकीत कौल दिला होता. मात्र, तो हिसकावून घेण्यात आला, हे खरे असले तरी काँग्रेस योग्य दिशेने काम करीत असल्याचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी काँग्रेस भवनात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  सांगितले.

राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.  खाण कंपन्यांकडून  कामगारांना घरी पाठवले जात आहे. कायदेशीर खाण व्यवसाय सुरू व्हायला हवा होता, अशा प्रतिक्रिया जनतेतून येत आहेत. मात्र, सरकारकडून हव्या त्या गोष्टीकडे लक्ष दिले जात नसल्याची टीकाही  कवळेकर यांनी यावेळी केली.

कवळेकर म्हणाले, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे देशहितासाठीचे कार्य मोठे आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात जे निर्णय घेतले त्याचा आजही देशाला फायदा होत आहे. देशात आयटी युग सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.  बरे-वाईट दिवस हे प्रत्येकालाच येतात. तसे ते काँग्रेसलादेखील आले. मात्र, काँग्रेस नष्ट झाली नाही. सर्वांनी संघटित राहून एकत्र काम करावे, असेही त्यांनी  सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, पंतप्रधान या  नात्याने राजीव गांधी यांनी अनेक क्रांतिकारी विकासकामे  राबवून देश पुढे नेला.  अनेक चांगले निर्णय घेतले. मतदानाची वयोमर्यादा 21 वर्षांवरुन 18 वर्षे करण्यात आल्याने युवा वगार्र्ला   सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला. याशिवाय देशात संगणक क्रांती  घडवण्यातही त्यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी काँग्रेसतर्फे बांबोळी येथील राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.