Thu, May 28, 2020 06:10होमपेज › Goa › गोवा अँटिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांचा कामावर बहिष्कार

गोवा अँटिबायोटिक्स कंपनीच्या कामगारांचा कामावर बहिष्कार

Last Updated: Mar 31 2020 10:23PM
पेडणे ः पुढारी वृत्तसेवा

मुरमुसे-तुये येथे असलेल्या गोवा अँटिबायोटिक्स या औषध कंपनीच्या कामगारांना आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी सुविधा  न  दिल्याने सुमारे 70 कामगारांनी   मंगळवारी कामावर रुजू होण्यास नकार दिला.मास्क , सॅनिटायझर तसेच आरोग्याची योग्य निगा राखणा-या सुविधा द्या,  अन्यथा कामावर रुजू  होणार नाही,असेही त्यांनी सांगितले. 

यासंबंधी कामगार नेते पुती गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार   गोवा अँटिबायोटिक्स या कंपनीतर्फे  कामगारांना मंगळवारी सकाळी कामावर बोलविण्यात आले. सुमारे 70 कंपनीचे कर्मचारी कामावर रुजू होण्यासाठी गेले.मात्र कंपनीतर्फे गेटवर कामगारांना कुठल्याच प्रकारची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुविधा नसल्याचे आढळून आले. सध्या सरकारने कोरोना  प्रकरणी लागू केलेली मार्गदर्शक तत्वे कंपनीने पाळली नाहीत.

गेटमधून आत प्रवेश केल्यावर कर्मचार्‍यांना  सॅनिटायझर , मास्क तसेच इतर कुठल्याच प्रकारची सुविधा  कंपनीने  पुरवली नाही. कंपनीच्या आत  काम करणारे कर्मचारी हे एकमेकांच्या जवळच बसून काम करणार त्यामुळे  सोशल डिस्टंन्सिंग राहणार नाही. त्यामुळे या कामगारांच्या  आरोग्याची जाबाबदारी कंपनी घेत  नसल्याचे स्पष्ट होते, असा दावा करून कंपनीच्या कामगारानी कामावर न जाण्याचा निर्णय
 घेतला. 

पेडणे तालुका संयुक्त मामलेदार   कामत यांनी कामगारानी कामावर रुजू व्हावे, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करणार असे सांगितले. त्यावर  कामगार नाराज झाले. काही वेळानंतर पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर व इतर पोलिस कंपनीच्या परिसरात आले. कंपनी बाहेर जमलेल्या कामगारांना निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सध्या  घोळका करुन एकत्र राहण्यास बंदी असल्याचे सांगून  144 कलम लागू असल्याने कायद्याचे उल्लंघन न करण्याचे या कामगारांना सांगितले. एकतर कामावर रुजू व्हा, नाहीतर  एकत्र   थांबू नका, असे सांगितले असता  जमलेले कामगार घरी गेले.