Mon, May 25, 2020 03:33होमपेज › Goa › मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गिरीश चोडणकर यांचा सत्याग्रह

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गिरीश चोडणकर यांचा सत्याग्रह

Published On: Nov 28 2018 1:21AM | Last Updated: Nov 28 2018 12:46AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे, या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथील आझाद मैदानावर सत्याग्रह केला. काँग्रेस पक्षाकडून हे आंदोलन आता तालुका पातळीवर नेले जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या आंदोलनाची सुरुवात शुक्रवार दि.30 नोव्हेंबर रोजी डिचोली बसस्थानकावरून केली जाईल. 1 डिसेंबर रोजी आंदोलन  पेडणे येथे होईल. या आंदोलनाची पुढील रुपरेषा  जाहीर करण्यात येणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

या सत्याग्रहात सहभागी झालेल्या चोडणकर यांना पाठींबा देण्यासाठी पक्षाचे गोवा प्रभारी ए. चेल्‍लाकुमार, आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, टोनी फर्नांडिस, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो आदी उपस्थित होते. सकाळी 10 ते संध्याकाळी  6 या दरम्यान  हा सत्याग्रह करण्यात आला.

चोडणकर म्हणाले, राज्यात प्रशासन पुन्हा प्रस्थापित व्हावे या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी उपोषण केले. मात्र, सरकारने त्याची दखल घेण्याची तसदीही घेतली नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मागील काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे केवळ राज्यातील सुरळीत प्रशासनासाठीच नव्हे तर त्यांच्या आरोग्याच्यादृष्टीनेदेखील त्यांनी राजीनामा देणे योग्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील विकासाला चाप बसला असून खाण  प्रश्‍न, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदी विविध समस्यांनी नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने केवळ उपोषणापुरते मर्यादीत न राहता हे आंदोलन तालुका पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय न्यायालयातदेखील लढा दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या आंदोलनात आता जनतेलादेखील सहभागी केले जाणार आहे.  सरकार असंवेदनशील बनले असून मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राजीनामा देणे हा राज्यातील विद्यमान स्थितीवर एकमेव पर्याय असल्याचेही चोडणकर यांनी सांगितले.