Thu, May 28, 2020 20:17होमपेज › Goa › काँग्रेस नेत्यांच्या भानगडी उजेडात आणू 

काँग्रेस नेत्यांच्या भानगडी उजेडात आणू 

Published On: Jan 19 2019 1:35AM | Last Updated: Jan 19 2019 1:35AM
मडगाव : प्रतिनिधी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आरोप आपण सहन करणार नाही. गरज भासल्यास काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या भानगडी उजेडात आणू, असा इशारा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दिला आहे. फातोर्डा येथे शुक्रवारी रस्ता डांबरीकरण उद्घाटनानंतर मंत्री सरदेसाई यांनी हा इशारा दिला. 

सरदेसाई म्हणाले, चोडणकर हे दिल्लीत असताना प्रादेशिक आराखड्यात दिल्लीकरांच्या गोव्यातील सोळा कोटी चौरस मीटर जमिनीचा  घोटाळा करून रूपांतरण करण्यात आले होते. दिल्लीकरांच्या जमिनींचे पैसे घेऊन करण्यात आलेल्या रूपांतरणाचा घोटाळा उघडा पडू नये याकरिता चोडणकर प्रयत्न करत आहेत.

गोव्यात काँग्रेसची अवस्था पाहून आपणाला कीव येते. सचिवालयात गेल्या वर्षात डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारणे आम्हाला शक्य झाले नाही पण गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसने काय केले, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 
गोवा फॉरवर्ड पक्षाने गेल्या एक वर्षात जे काही केले ते काँग्रेस पक्षाला आतापर्यंत कधीच जमले नाही. आता निवडणुका जवळ येत आहेत त्यामुळे सभागृहात बैठका घेऊन भाषणे करण्यापेक्षा काँग्रेस  नेत्यांनी रस्त्यावर उतरून कृती करावी, असे ते म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर दुसर्‍याने दिलेले पत्रक वाचून पत्रकार परिषद घेतात.  काँग्रेस पक्षावर प्रवक्ते म्हणून वकिलांना नेमण्याची वेळ आल्याची टीका सरदेसाई यांनी केली. 

अधिवेशनात अधिसूचना आणून नगरनियोजन कायद्यात बदल करण्यात आले आहेत. मागील दारातून अधिसूचना आणण्यात आलेली नाही. नगरनियोजन खात्यात पारदर्शकता आहे. आम्ही काँग्रेसच्या भानगडी बाहेर काढू शकतो, असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे.

कामतांच्या काळात अनेक घोटाळे

दिगंबर कामत मुख्यमंत्रिपदी असताना दिल्लीवाल्यांनी घोटाळे करून प्रदेशिक आराखड्यात अनेक रूपांतरणे केली होती. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या कंपनीच्या जमिनीचे रूपांतरण करण्यात आले. तपोभूमीची  अडीच कोटी चौरस  मीटर जमीन आम्ही रूपांतरित केली आहे. गिरीश चोडणकर या जमिनींचे रूपांतरण रद्द करू पाहत आहेत का, असा प्रश्‍नही मंत्री विजय सरदेसाई यांनी केला.