Wed, Jul 08, 2020 13:12होमपेज › Goa › मडगावात कचरा उचल ठप्प

मडगावात कचरा उचल ठप्प

Published On: Jun 05 2019 1:28AM | Last Updated: Jun 06 2019 1:34AM
मडगाव ः प्रतिनिधी

वर्गीकरणाशिवाय आलेला कचरा सोनसड्यावर न घेण्याच्या कुडतरीवासीयांच्या निर्णयामुळे मडगाव नगरपालिकेसमोरील अडचणी वाढत चाललेल्या आहेत. कचर्‍याने भरलेल्या बारा गाड्या अज्ञातांनी पंक्चर करून टाकल्याने मंगळवारी दिवसभर मडगाव पालिकेच्या पंचवीसही प्रभागातील कचरा उचलला गेला नाही. बारा तास सर्व प्रभागांत 64 टन कचरा तसाच पडून होता. या प्रकारामुळे मडगाव आणि फातोर्ड्यातील जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वर्गीकरण केलेला कचरा न आल्यास सोमवारपासून सोनसड्यावर कचर्‍याची एकही गाडी येऊ देणार नाही, असा इशारा कुडतरीवासीयांनी दिला होता. सोमवारी पाच गाड्या लोकांनी सोनसड्यावरून तशाच परत पाठवल्या होत्या. सोनसड्यावरून परत पाठवलेल्या गाड्या पालिकेने खालच्या बाजारात असलेल्या गॅरेजमध्ये पार्क करून ठेवल्या होत्या, मध्यरात्री अज्ञातांनी सर्व वाहनांची पुढील चाके पंक्चर करून ठेवली. 

मंगळवारी सकाळी कामगार नेहमीप्रमाणे कचरा उचलण्याच्या कामासाठी रुजू झाले, पण कचरा नेणार्‍या गाड्या पंक्चर असल्याचे आढळल्याने, त्याचबरोबर सर्व गाड्यांमधील कचरा खाली न झाल्याने मंगळवारी कचरा दिवसभर तसाच पडून होता. सकाळी पालिकेने कचरा भरलेली एक गाडी ताडपत्रीने झाकून सोनसड्यावर पाठवली होती, पण कुडतरीमधील लोकांना याचा सुगावा लागल्याने कुडतरीतील अनेक महिला सोनसड्यावर दाखल झाल्या आणि त्यांनी कचर्‍याच्या गाड्या अडवून माघारी पाठवल्या.

सोमवारी कचर्‍याने भरलेल्या गाड्या मंगळवारीसुद्धा रिकाम्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा शहरात साचून राहिला होता. पंचवीसही प्रभागांत दिवसभर तसाच कचरा पडून होता. हरी मंदिर, लिली गारमेंट परिसर, मडगाव पोलिस स्थानक परिसर, एसजीपीडीए संकुल, मार्केट परिसर व इतर भागात दिवसभर तसाच कचरा पडून होता. लोकांच्या दुकानासमोर कचर्‍याचे ढीग साचले होते. गांधी मार्केट, सडेकर लेन अशा ठिकाणी कचरा साठलेला होता. पालिकेच्या कामगारांनी कचरा प्रत्येक पॉईंट्सवर साठवून ठेवला होता. पण कचरा नेण्यासाठी पालिकेच्या गाड्या येऊ न शकल्याने सायंकाळी उशिरापर्यंत एकही टन कचरा मडगावमधून हलू शकला नाही.

पोलिस संरक्षणात कचरा पोहचला सोनसड्यावर !

 नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा फातोर्डा पोलिसांकडे पोलिस संरक्षण पुरवण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिस संरक्षणात सर्व बारा गाड्या सोनसड्यावर नेऊन खाली करण्यात आल्या. यात सहा कॉम्पॅक्टर, चार ट्रक, आणि दोन रिक्षांचा समावेश होता.पालिकेच्या गॅरेजपासून ते सोनसड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता.