Wed, Jul 08, 2020 13:26होमपेज › Goa › मडगाव पालिकेची कचरा सेंटिनल योजना ठप्प

मडगाव पालिकेची कचरा सेंटिनल योजना ठप्प

Published On: Jul 23 2019 1:17AM | Last Updated: Jul 23 2019 12:15AM
मडगाव : प्रतिनिधी 

मडगाव नगरपालिकेने सुरू केलेल्या कचरा सेंटिनल योजनेचा फज्जा उडाला असून योजनेसाठी वापरला जाणारा मोबाईल मुख्याधिकार्‍यांनी आपल्याकडेच ठेवल्याने गोंधळ उडाला आहे. ते फोन घेऊन विधानसभेत जात असल्याने कारवाई रखडलेली असून याचा पाठपुरावा अन्य कर्मचार्‍यांनाही करता येत नाही. सेंटिनल योजना थंडावल्याने नागरिकांत संताप निर्माण झाला आहे. 

पालिकेने कचरा सेंटिनल योजना राबविताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर कचरा टाकणार्‍या व्यक्तीचा फोटो आणि चित्रफीत व्हॉटस्अपद्वारे पाठवणार्‍यांना एक हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते, तर कचरा फेकणार्‍या व्यक्तीला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याचा इशारा दिला होता. पंधरा दिवसांपूर्वी नव्यानेच ही योजना सुरू करून मुख्याधिकारी नाईक रजेवर गेले होते. त्यावेळी ते फोन आपल्यासोबत घेऊन गेल्याने गोंधळ निर्माण झाला होता. 

योजना सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी व्हॉटस्अप क्रमांकावरून आठ प्रकरणे नोंद झाली होती. तेव्हा पालिकेला त्वरित या प्रकरणांची नोंद घेता आली नाही. हाच प्रकार सध्या गेल्या आठ दिवसांपासून पाहायला मिळत असून मुख्याधिकारी स्वतः हा फोन आपल्याकडे ठेवून फिरत असल्याने त्यात नोंद होणार्‍या प्रकरणांचा पाठपुरावा होत नसल्याने कर्मचारी वैतागले आहेत.  नाव उघड न करण्याच्या अटीवर पालिकेतील एका कर्मचार्‍याने सांगितले की, मुख्याधिकारी सेंटिनल योजनेसाठी वापरण्यात येणारा फोन आपल्याजवळ ठेवतात. त्यामुळे येथे येणार्‍या प्रकरणांचा पाठपुरावा अन्य कुणालाच करता येत नाही. मुख्याधिकारी ज्यावेळी माहिती पुरवतात तेव्हाच आम्हाला या प्रकरणांची माहिती कळते. गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी थोडाच वेळ पालिकेत राहून निघून जात असल्याने कोणत्याच कर्मचार्‍यांना त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. मुख्याधिकार्‍यांनी योजना सुरू केली आहे. मात्र, सक्तीने अंमल करत नसल्याने नागरिकांची चिडचिड आम्हाला ऐकून घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, पालिकेने ही योजना सुरू करण्याअगोदर स्थानिक आमदार दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड यांना विश्वासात घेतले नसून कोणत्याच नगरसेवकांना याविषयी माहिती दिली नाही, असा आरोप अनेक नगरसेवकांनी योजनेच्या उद्घाटनाच्यावेळी केला होता. ही योजना रखडणार असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला होता. 

योजनेविषयी मुख्याधिकार्‍यांचे मौन

मुख्याधिकारी पालिकेत उपलब्ध नसल्याने त्यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास ते आपण विधानसभेत असल्याचे कारण पुढे करतात. सध्या काहीच सांगू शकत नाही, असे सांगून ते विषय टाळत आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेवरून कचरा सेंटिनलविषयी त्यांनी मौन साधल्याचे स्पष्ट होत आहे, असे एका कर्मचार्‍याने सांगितले.