Thu, Jul 02, 2020 13:53होमपेज › Goa › बायंगिणीत कचरा प्रकल्प लादल्यास न्यायालयात जाऊ

बायंगिणीत कचरा प्रकल्प लादल्यास न्यायालयात जाऊ

Published On: Jul 22 2019 2:02AM | Last Updated: Jul 22 2019 2:02AM
पणजी : प्रतिनिधी 

बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रकल्पाला जुने गोवे पंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. जुने गोवे पंचायत मंडळाने या प्रश्नाबाबत स्थानिकांसोबत राहण्याचा ठराव संमत केला. कचरा प्रकल्प जबरदस्तीने लादल्यास त्याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय रविवारी पार पडलेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. दरम्यान, स्थानिक आणि कुंभारजुवे मतदारसंघातील रहिवाशांनी प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शवून गांधी चौकात दुपारी निदर्शने केली. 

जुने गोवे पंचायत सभागृहात झालेल्या या सभेत मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रामुख्याने पणजी-जुने गोवे बगलमार्गाशेजारील बायंगिणी येथील डोंगराळ भागात नियोजित कचरा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी आपापली मते मांडली. या प्रकल्पाच्या प्रस्तावित जागेच्या सभोवताली अनेक घरे, बंगले बांधण्यात आले असून प्रकल्पातील कचर्‍याच्या दुर्गंधीचा अणि कचर्‍याचा स्थानिकांना त्रास होणार असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. नियोजित कचरा प्रकल्पाशेजारी शाळा, धार्मिक मठ तसेच 200 खाटांचे इस्पितळ असल्याने अनेकांना प्रकल्पामुळे त्रास होण्याचा धोका असल्याचे मत काहींनी मांडले. जुने गोवे येथील विश्वविख्यात सेंट झेवियर चर्च परिसर आणि ‘युनेस्को’ मान्यताप्राप्त वारसास्थळे अवघ्या 200 मीटर्स अंतराच्या आत असल्याने या स्थळांवर विपरित परिणाम होण्याची भीती काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. याशिवाय, प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ असल्याने अनेकांची रोजीरोटी पर्यटकांवर अवलंबून आहे. सदर भागात कचरा प्रकल्प आल्यास पर्यटकांची संख्या रोडावल्यास त्याचा पंचायतीच्या उत्पन्नावरही गंभीर परिणाम होण्याचा धोका काही सदस्यांनी अधोरेखित केला.

या सभेत दोन महत्वाचे ठराव संमत करण्यात आले. नियोजित कचरा प्रकल्पाला विरोध करून तो या ठिकाणी स्थापन न करण्याचा पहिला ठराव घेण्यात आला. जुने गोवे भागातील वारसास्थळे जतन करण्याचा आणि त्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना करावी, असा दुसरा ठराव घेण्यात आला. हे दोन्ही ठराव सर्वसंमतीने घेण्यात आले असून उपस्थित पंचायत सदस्यांनीही ग्रामस्थांच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केला.
 
पंचायतही स्थानिकांसोबत

बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रकल्प जुने गोवे ग्रामस्थांवर लादल्यास जुने गोवे पंचायतीने चांगला वकील नेमून उच्च न्यायालयात प्रकल्पाविरोधात कायदेशीर लढा देण्यासही ग्रामसभेने मान्यता दिली. पंचायतीच्या सर्व सदस्यांनी आपण या प्रश्नाबाबत ग्रामस्थांबरोबर राहणार असून गरज पडल्यास रस्त्यावर बसण्याचा ठाम निर्धार सर्व पंच सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. 

‘जुने गोवेला दुसरा सोनसडा बनवायचे नाही’

जुने गोवे भागात येणारा कचरा प्रकल्प हा येथील लोकांसाठी हानिकारक असून बायंगिणीला दुसरा सोनसडा किंवा साळगाव बनवायचे नाही, अशा घोषणा देत पोरने गोंयचो नागरिक मंचाचे डॉ. अरविंद कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित कचरा प्रकल्पाला स्थानिक आणि कुंभारजुवे मतदारसंघातील रहिवाशांनी विरोध दर्शवून गांधी चौकात निदर्शने केली.