Wed, Jul 08, 2020 13:56होमपेज › Goa › मेरशीत गँगवॉर; ८जणांना अटक

मेरशीत गँगवॉर; ८जणांना अटक

Published On: Jun 04 2018 1:37AM | Last Updated: Jun 04 2018 1:37AMपणजी : प्रतिनिधी

मेरशी येथे गोवेकर बारजवळ शनिवारी रात्री झालेल्या सशस्त्र टोळीयुद्धात 4 जण जखमी झाले.  घटनास्थळावरून जुने गोवा पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. घटनेत वापरण्यात आलेल्या 7 दुचाकी तसेच  दोन चाकू पोलिसांनी जप्त केलेे. या दोन्ही गटातील चार जण जखमी झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस उपअधीक्षक नेल्सन अल्बुकेर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 2) रात्री 10.45 च्या सुमारास मेरशी बाजारातील गोवेकर बारजवळ दोन गटांत आधी पूर्ववैमनस्यातून बाचाबाची झाली. एका गटातील 9 जणांनी दुसर्‍या एका गटातील सूरज शेट्ये याला धाक दाखवण्यास प्रारंभ केला. शेट्ये याला चाकू, तलवारी आणि बंदुकीचा धाक दाखवताच शेट्ये समर्थक गटाने 9 जणांच्या टोळीवर हल्ला केला. शेट्ये समर्थक गटाने हल्ल्यात चाकू, चॉपर आणि बिअर बाटल्यांचा वापर केला.  या धुमश्‍चक्रीत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. यामध्ये सूरज शेट्ये,  अब्दुल मालदार,  समीर मुल्ला, निसार यांना गंभीर जखमा झाल्याने त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज शेट्ये टोळीत मार्सेलिन डायस, विशाल गोलतकर, गौरेश नाईक यांच्यासह आणखी पाचजण तर दुसर्‍या टोळीत समीर मुल्ला, अब्दुल मालदार, आतिफ निरगी, अख्तर मुल्ला, इरफान कित्तूर, निसार, शहबाज मुल्ला, जोशुआ तलवार, मुबारक मुल्ला, नियाज बेग यांचा समावेश आहे. या गँगवॉर प्रकरणाची माहिती मिळताच जुने गोवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी  2 मोटारसायकली आणि 5 स्कूटर्स मिळून सात दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. दोन्ही गटातील आठ जणांना जमाव करणे, सशस्त्र हल्ला करणे आदी गुन्ह्यांखाली अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारींची पोलिसांनी नोंद केली आहे.