Mon, May 25, 2020 09:57होमपेज › Goa › गांधीजींचे विचार जपावेत : राज्यपाल सत्यपाल मलिक 

गांधीजींचे विचार जपावेत : राज्यपाल सत्यपाल मलिक 

Last Updated: Dec 03 2019 1:15AM

पणजी : ‘गांधी कथा’ कार्यक्रमात बोलताना राज्यपाल सत्य पाल मलिक. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, वरूण साहनी व अन्य. (छाया : समीर नार्वेकर)पणजी: प्रतिनिधी 
महात्मा गांधी हा मुळातच फार मोठा विषय असून त्यावर हजारो पुस्तके लिहिली जाऊ शकतात.  गांधीजींचे विचार मामूली नव्हते. गांधीजींनी लोकांना प्रतिष्ठेने जगणे शिकविले व मानवी हक्क मिळवून दिले. गांधीजींचे महान विचार  जपणे आवश्यक  आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले.      

महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे राज भवन च्या संयुक्त विद्यमाने  सोमवारी संस्कृती भवनात ‘गांधी कथा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल मलिक बोलत होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरूण साहनी, सचिव रुपेश कुमार ठाकुर, कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरूदास पिळर्णकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, अन्यायाविरोधात लढण्याचा महात्मा गांधीजींनी दिलेला मंत्र स्वातंत्र्यानंतर सर्वजण विसरत चालले आहेत. स्वातंत्र्यानंतर काहींनी गांधीजींच्या विचारांना तिलांजली दिली, तर काहींनी त्यांचे विचार जीवनात आत्मसात केले. गांधीजींनी अहिंसेचे सूत्र इतके आत्मसात केले होते की गांधीजींशी लढावे कसे, असा प्रश्‍न  सर्वांनाच पडत असे. त्यांच्या कार्याचा समाजावर प्रभाव पडत असे.   

गांधीजींनी संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी वाहून घेतले होते. गांधीजींशी बोलायला मोठमोठ्या अधिकार्‍यांना त्यांच्याकडून वेळ मागून घ्यावा लागत असे. लोक आज आमदारकी मिळाल्यावर वेडे होतात. गांधीजींनी कधीच राहणीतला साधेपणा सोडला नाही, असे ते म्हणाले. 

जवाहरलाल नेहरू यांनी गांधीजींना शासन चालविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यावर गांधीजींनी, आपल्या लेखणीतून जाणार्‍या प्रत्येक कागदाचा समाजातील शेवटच्या माणसाला देखील फायदा व्हायला हवा. त्यानुसार निर्णय घ्यावा, असे नेहरूंना सांगितले होते. गांधीजी ज्यावेळी चंपारण्यमध्ये गेले तेव्हा ते मोहनदास करमचंद गांधी होते, मात्र चंपारण्य मधून येतेवेळी गांधीजी ‘महात्मा’ गांधी झाले, असेही सत्यपाल मलिक यांनी बोलताना सांगितले. 

उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले, गांधीजींचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान महान आहे. युवा पिढीने त्यांचे कार्य आत्मसात करणे आवश्यक आहे. गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश आपण तो पुढे न्यायला हवा. त्यांचे कार्य व शिकवण हा सर्वांचाच अमूल्य ठेवा आहे. 

उदघाटन कार्यक्रमानंतर ‘गांधी कथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शोभना राधाकृष्णन व अन्य कलाकारांनी यात सहभाग घेतला.  कार्यक्रमात पिळर्णकर यांनी स्वागत केले.