Mon, May 25, 2020 03:06होमपेज › Goa › गांधीजींचा स्वच्छतेचा मंत्र जपा

गांधीजींचा स्वच्छतेचा मंत्र जपा

Published On: Oct 03 2019 2:08AM | Last Updated: Oct 03 2019 2:08AM
पणजी : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपने गोव्यासह देशभर गांधी संकल्प यात्रेचे आयोजन केले आहे. राज्यात प्लास्टिक वापर बंदीवर सरकार ठाम आहे. गांधींचा स्वच्छतेचा मूलमंत्र जो प्रत्येकाने जपायला हवा. हस्तकला विकास  महामंडळाने  कापडी पिशव्यांचे वाटप बुधवारपासून सुरू केले असून  यापुढे बाजारपेठेत किमान दराने या पिशव्या वितरीत केल्या जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. 

भाजपाने गांधी जयंतीनिमित्त  बुधवारी पणजीत पदयात्रा काढली. या पदयात्रेत आमदार आंतानसिओ मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर, उपमहापौर पाश्कोला मास्करेन्हास,  पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की गांधींचे विचार आतापर्यंत संपूर्ण भारतभर पोहोचणे गरजेचे होते. महात्मा गांधीजींच्या स्वच्छता, अहिंसा या गुणांचा आम्ही प्रसार व स्वीकार करायला हवा. पर्यावरण सांभाळण्यासाठी किमान ‘सिंगल युज’ प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्ण थांबवायला हवा. पहिल्या टप्यात सरकार कुणाला दंड करणार नाही. प्रथम जनजागृतीवर भर देणार असून  प्लास्टिक पिशव्यांचा वापर बाजारपेठेत पूर्णपणे बंद करण्याची वेळ आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रत्येकाने स्वत:पासून प्लास्टिकबंदी  सुरू केली, तर आपोआप संपूर्ण देश प्लास्टिकमुक्त होऊन महात्मा गांधींचा संकल्प पूर्ण होईल. गृहिणींनीही घरगुती वापरासाठी कापडी पिशव्या तयार कराव्यात, असे आवाहन करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दुकानांत जाऊन कापडी पिशव्यांचे वाटपही केले.

दरम्यान, पणजीतील भाजप कार्यालयापासून सुरू झालेल्या यात्रेची आझाद मैदानावर सांगता झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यात्रेचा समारोप करण्यात आला. पणजीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले होते.

कुंकळ्येकरांची अनुपस्थिती

पणजीचे महापौर उदय मडकईकर, माजी महापौर विठ्ठल चोपडेकर व काही नगरसेवक प्रथमच उघडरीत्या भाजपच्या कार्यक्रमात सामील झाले होते. यामुळे त्यांचा भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश झाल्यासारखा मानले जात आहे. मात्र, आश्‍चर्य म्हणजे, भाजपाचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवून गेली.