Tue, May 26, 2020 06:08होमपेज › Goa › पोलिसांना गुंगारा देणारा गॅबी लॉकडाऊनमुळे लॉकअपमध्ये

पोलिसांना गुंगारा देणारा गॅबी लॉकडाऊनमुळे लॉकअपमध्ये

Last Updated: Apr 27 2020 12:48AM

संग्रहित छायाचित्रमडगाव : पुढारी वृत्तसेवा

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन महाराष्ट्रात पळून गेलेला आणि दक्षिण गोव्यातील चार पोलिस स्थानकांना विविध प्रकरणांत हवा असलेला अट्टल गुन्हेगार गॅबी फर्नांडिस याच्या मुसक्या आवळण्यात रविवारी कुडचडे पोलिसांना यश आले. आंबेउदक येथील त्याच्या घरात पोलिसांनी त्याला अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅबी फर्नांडिस तब्बल दीड महिने कोल्हापुरात लपून बसला होता. लॉकडाऊनमुळे त्याचे खायचे-प्यायचे वांदे झाल्यामुळे तो गोव्यात आला होता. कुडचडे पोलिसांना त्याचा सुगावा लागताच आंबेउदक येथील त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले. लॉकडाऊनमुळे कोरोना नियंत्रणात आलाच आहे, त्याशिवाय अट्टल गुन्हेगारही जेरीला आले आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

लॉकडाऊन असताना बाहेरच्या राज्यातून गोव्यात परतल्याबद्दल त्याच्या विरोधात भा. दं. सं. चे कलम 269 आणि 188 अन्वये गुन्हा नोंद केल्याची माहिती नायक यांनी दिली आहे. गॅबी याला क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे.

कुडचडे पोलिसांनी पाळत ठेवून रविवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याला फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सविस्तर माहितीनुसार गॅबी फर्नांडिस हा वाहन चोरीच्या अनेक गुन्ह्यांबरोबर इतर असंख्य प्रकरणांत दक्षिण गोव्यातील चार पोलिस स्थानकांना हवा आहे. फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार दीड महिन्यांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गॅबी फर्नांडिस पळून गेला होता. रविवारी कुडचडे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्राप्त माहितीनुसार गॅबी याच्या विरोधात मडगाव, कोलवा, कुंकळ्ळी तसेच फातोर्डा पोलिस स्थानकात असंख्य गुन्हे नोंद आहेत. मागच्या वेळी कुडचडे पोलिसांनी त्याला पकडून कुंकळी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याला उपचारासाठी हॉस्पिसियोमध्ये पाठवले असता पोलिसांची नजर चुकवून तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. शनिवारी तो गोव्यात आल्याची माहिती कुडचडे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्रभर त्याच्या हालचालींवर पाळत ठेवण्यात आली. आपल्याला पोलिस पकडतील या भीतीमुळे तो रात्रभर जंगलात लपून बसला होता. पहाटे तो आपल्या घरी झोपण्यासाठी गेला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. गॅबी नेहमी स्वतःजवळ चाकू किंवा कट्टा पिस्तुल बाळगत असे. जीव धोक्यात घालून पोलिसांनी सलग दुसर्‍यांदा गॅबी याला ताब्यात घेतल्यामुळे कुडचडे पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री तो बेळगाववरून माल घेऊन येणार्‍या वाहनातून अनमोड मार्गे मोलेत आला होता. मोले चेकनाक्यावर पोलिस बंदोबस्त असलेला पाहून त्याने चेकनाका चुकवण्यासाठी जंगलातील पायवाट धरली, आणि तेथून आपल्या आईला फोन करून न्यायला बोलावले.

कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव नाईक, कॉन्स्टेबल अविनाश नाईक आणि इतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली. वाहन चोरीच्या प्रकरणात गॅबी याच्यावर बेळगाव पोलिस स्थानकातसुद्धा तक्रार नोंद आहे.

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅबी फर्नांडिस याला कुडचडे पोलिसांनी फातोर्डा पोलिसांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

कारवाईत सहभागी पोलिसांत भीती ? 

राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन आहे, त्याशिवाय सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. या परिस्थितीत मोले चेक नाक्यावरील पोलिस बंदोबस्त चुकवून अट्टल गुन्हेगार गॅबी गोव्यात दाखल झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेले दीड महिने गॅबी कोल्हापूरमध्ये वास्तव्याला होता. त्यामुळे जीवाची पर्वा न करता त्याला पकडणार्‍या पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याला पकडण्यासाठी मोलाची जबाबदारी निभावणार्‍या पोलिसांना क्वारंटाईन होण्याविषयी अजून सांगण्यात आलेले नाही, असे समजते.