होमपेज › Goa › लाच स्वीकारताना जीटीडीसी कनिष्ठ अभियंत्यास अटक

लाच स्वीकारताना जीटीडीसी कनिष्ठ अभियंत्यास अटक

Published On: Jan 23 2019 1:32AM | Last Updated: Jan 23 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

भ्रष्टाचारविरोधी पथकाने  मंगळवारी  केलेल्या कारवाईत गोवा पर्यटन विकास महामंडळाचा कनिष्ठ अभियंता विभेश प्रभुदेसाई याला कंत्राटदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. पाटो-पणजी येथील पर्यटन खात्यात असलेल्या महामंडळाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार प्रभुदेसाई यांनी महामंडळासाठी भाड्याने वाहने देणार्‍या कंत्राटदाराकडे  कमिशन म्हणून 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर सदर प्रकरणी कंत्राटदाराने भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार केली. पथकाने  कंत्राटदाराला प्रभुदेसाई याला फोन करुन या कमिशनचा पहिला हप्ता म्हणून पाच हजार रुपये निश्‍चित करण्यास सांगितले. त्यानुसार कंत्राटदार  महामंडळाच्या कार्यालयात लाचेचे पैसे देण्यासाठी संध्याकाळी 5.30 वाजता गेला असता पोलिसांनी प्रभुदेसाई याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.