Mon, May 25, 2020 10:03होमपेज › Goa › विधानसभा कामकाज चारवेळा तहकूब

विधानसभा कामकाज चारवेळा तहकूब

Last Updated: Feb 06 2020 11:27PM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

भाजप नेत्याला धमकी दिल्याच्या आरोपाखाली अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर केलेल्या अटकेचा विरोधी आमदारांनी गुरुवारी विधानसभेत निषेध करुन कामकाज रोखून धरले. आमदार रोहन खंवटेसह विरोधी आमदारांनी गोंधळ घालणे सुरूच ठेवल्याने सभागृहाचे कामकाज चारवेळा तहकूब करण्यात आले. त्यामुळे सकाळच्या सत्रात कुठलेच कामकाज झाले नाही. 
आमदार खंवटे यांना बुधवारी मध्यरात्रीनंतर 1.50 वाजता अटक करुन त्यांना 2.30 वाजता जामिनावर सोडण्यात आले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. गुरुवारी सकाळी 11.30 वाजता सभागृहाच्या कामकाजाला सुरवात होताच काँग्रेससह अन्य विरोधी आमदारांनी खंवटे यांच्या अटकेचा निषेध करुन गोंधळ घालण्यास सुरवात केली. सर्व विरोधी आमदार हाताला काळ्या फिती बांधून सभागृहात आले होते.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, आमदार खंवटे यांना विधानसभा अधिवेशन सुरु असताना अटक करणे असंविधानिक असून ही लोकशाहीची थट्टा आहे. गोव्याच्या इतिहासात अशी घटना पहिलीच आहे. आमदारांचे हित सभापती जपणार नाही तर कोण जपणार, असा प्रश्‍न करून कामत म्हणाले की, सभापतींनी आपली भूमिका योग्य प्रकारे बजावणे आवश्यक होते. लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. सभापतींच्याच आदेशावरुन ही अटकेची कारवाई झाल्याची टीका त्यांनी केली. 

विरोधी आमदारांनी खंवटे यांच्या अटकेचा मु्द्दा उपस्थित करताच सभापती राजेश पाटणेकर म्हणाले की, प्रेमांनद म्हांब्रे यांनी आमदार खंवटे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. सदर घटना ही विधानसभा परिसरात घडल्याने ती तक्रार आपल्याकडे आली होती. आपण ती चौकशीसाठी पोलिसांकडे वर्ग केली .

सभापतींच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभापतींसमोर गोंधळ घालायला सुरवात केली. त्यावर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ध्या तासासाठी तहकूब केले. त्यानंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यासाठी सभापती सभागृहात दाखल होताच पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्यासह विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, लुईझिन फालेरो, रवी नाईक, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदसाई, विनोद पालयेकर, जयेश साळगावकर व मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 12.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र, त्यानंतरदेखील विरोधकांकडून गोंधळ कायम राहिल्याने सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा दुपारी 2.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 

दुपारच्या सत्रात तरी सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, दुपारी 2.30 वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधक पुन्हा एकदा गोंधळ घालत सभापतींसमोर गेले व न्याय द्यावा अशी घोषणाबाजी करायला सुरवात केली. त्यावर पुन्हा कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.