Fri, Sep 20, 2019 22:29होमपेज › Goa › पणजीत २६ पासून ‘द स्पिरीट ऑफ गोवा फे स्टिव्हल’

पणजीत २६ पासून ‘द स्पिरीट ऑफ गोवा फे स्टिव्हल’

Published On: Apr 20 2019 1:52AM | Last Updated: Apr 20 2019 12:57AM
पणजी : प्रतिनिधी 

गोवा पर्यटन खात्यातर्फे 26 ते 28 एप्रिल 2019 दरम्यान द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हलच्या दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. कांपाल पणजी येथील फुटबॉल मैदानावर हा महोत्सव गोवा फेणी डिस्टिलियर्स अँड बॉटलर्सच्या सहकार्याने होणार आहे.

या तीन दिवसीय महोत्सवात गोव्याचे पारंपरिक नारळ, काजूपासून बनवलेले खाद्यपदार्थ, पेय, हस्तकलेच्या वस्तू इत्यादींच प्रदर्शन व विक्री केली जाईल. या पदार्थांचे पारंपरिक पैलू आणि चांगले गुणधर्म तसेच त्याच्याशी संबंधित पूरक उत्पादने आणि पेये प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामध्ये फेणी, उरक, स्थानिक पेये, लिकर्स, घरगुती वाईन यांचा समावेश असेल. 

द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिव्हल 2019 मध्ये काजूरसापासून  फेणी कशी बनते, याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. या महोत्सवादरम्यान विविध आकर्षक उपक्रम, मनोरंजन, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

या तीन दिवसी महोत्सवाला भेट देणार्‍यांना कोकणी आणि पोर्तुगीज अभिजात संगीतापासून आधुनिक इंग्रजी लॅटिन शैलीचे जॅझ व फंक रिदमसह संगीत यात ऐकायला मिळणार आहे. महोत्सवात भव्य सादरीकरण आणि आत्तापर्यंत कधी न पाहायला मिळालेला पूर्ण ब्रास सेक्शन अनुभवता येणार आहे. 

महोत्सवात एक भव्य, डिजिटल  स्क्रीन अस्सल गोवन संकल्पनांवर आधारित थ्रीडी पार्श्वभूमी दर्शवत राहाणार असून त्यामुळे सर्व प्रेक्षकांना नेत्रसुखद पर्वणी मिळार आहे.

दरम्यान,  महोत्सवाच्या ठिकाणी  मोफत पार्किंग सुविधा ठेवण्यात आली आहे. पार्किंगसाठी जागा नसल्यास प्रेक्षकांनी परेड मैदान वापरावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी सर्व कार चालकांना आपल्या गाड्या पदपथावर न लावण्याचे आवाहन केले आहे.