Thu, May 28, 2020 07:32होमपेज › Goa › आ. सिल्वेरांना भाजपात प्रवेश नाही : तेंडुलकर

आ. सिल्वेरांना भाजपात प्रवेश नाही : तेंडुलकर

Published On: Jun 12 2019 1:18AM | Last Updated: Jun 12 2019 1:18AM
पणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना भाजपात प्रवेश देण्याचा पक्षाचा कोणताही विचार नाही. भाजप आघाडी सरकार सध्या बलवान व स्थिर आहे, असे सांगून उर्वरित तीन वर्षांचा कार्यकाळ सरकार पूर्ण करणार आहे, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्‍त केला. 

सांतआंद्रेचे काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वृत्तामुळे अस्वस्थ झालेल्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी रामराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची भेट घेऊन त्यासंबंधी विचारणा केली. सिल्वेरा यांना भाजपात प्रवेश देण्यास विरोध करणारे निवेदन सांतआंद्रेचे भाजप मंडळ अध्यक्ष रवींद्र बोरकर यांनी तेंडुलकर यांना सादर केले. 
 कार्यकर्त्यांना शांत करत यावेळी तेंडुलकर म्हणाले की, भाजपमध्ये सिल्वेरा यांना प्रवेश देण्याचा कोणताही विचार नाही. काही काँग्रेस आमदारांचा भाजपात प्रवेश करण्याचा विचार असून त्याला भाजपने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. हा कदाचित आमदार सिल्वेरा समर्थकांचा डाव असण्याचीही शक्यता आहे. 

रवींद्र बोरकर म्हणाले की, सिल्वेरा आणि त्यांचे काही समर्थक उघडपणे स्थानिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना भेटून आ. सिल्वेरांच्या भाजप प्रवेशाबद्दलची वावडी पसरवत असल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. यासाठी वस्तुस्थिती समजण्यासाठी भाजप नेत्यांना आम्ही भेटण्यास आलो होतो. सांत आंद्रे मतदारसंघात रामराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते चांगले काम करत असून सांत आंद्रेची जागा काँग्रेसकडून पुन्हा भाजपाकडे जिंकून घेण्याची तयारी सुरू आहे.