Fri, May 29, 2020 20:58होमपेज › Goa › भाजपला जनताच धडा शिकवणार

भाजपला जनताच धडा शिकवणार

Published On: Apr 01 2019 1:06AM | Last Updated: Apr 01 2019 12:01AM
दाबोळी : प्रतिनिधी

भापज सरकारने प्रत्येकवेळी आश्‍वासनांबाबत यूटर्न घेऊन  लोकांची फसवणूक केली आहे. मतदार आता जागे झाले असून तेच भाजपला धडा शिकवणार आहेत. गोव्यात काँग्रेस दोन्ही जागांवर यश मिळेल, असे   माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी मुरगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांसमवेत  रविवारी बैठक घेऊन निवडणूक प्रचाराचे नियोजन केले. या बैठकीला काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्यासह मुरगांव मतदारसंघातील कार्यकर्ते  उपस्थित होते.

फ्रान्सिस सार्दिन म्हणाले, की    नोटाबंदी व जीएसटीतून सरकारने लोकांची  पिळवणूक केली आजे.  भाजपा सरकारने काँग्रेसच्याच जुन्या योजना अंमलात आणून बढाया मारून  लोकांची फसवणूक चालवली असल्याचे  सांगून म्हणाले. या फसवणुकीची जाणीव लोकांना झाली असून केंद्रात काँग्रेसचेच सरकार सत्तेत येईल.

दक्षिण गोव्यातील समस्या आपण मागच्या आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात सोडवल्या होत्या. अजूनही काही समस्या आहेत. त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे ते म्हणाले. मुरगावात  कोळसा तसेच मुरगाव बंदराचा विस्तार या प्रमुख समस्या असून  लोकांच्या आरोग्याचाही विचार व्हायला हवा. मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषण लोकांच्या जीवावर बेतले असून यावर उपाययोजना  करणे  गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

नद्यांचे राष्ट्रीयीकरण उर्वरीत देशाप्रमाणे गोव्यात लागू करणे गैर आहे. खाण बंदीमुळे अनेक जण देशोधडीला लागले आहेत.    लोकांच्या पोटापाण्याचा  प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप खासदारांना आवश्यक काळात पंतप्रधानांची भेटही घेता आलेली नाही.  हे सरकार यूटर्न सरकार असून याचा धसका अख्ख्या देशाने घेतला आहे,त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही,असेही सार्दिन म्हणाले. 
 या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष ज्यो डायस, सुभाष फळदेसाई, अतूल वेर्णेकर, जनार्दन भंडारी उपस्थित होते.