Wed, Feb 21, 2018 10:48होमपेज › Goa › कोने प्रियोळ येथे कारच्या धडकेत चारजण जखमी

कोने प्रियोळ येथे कारच्या धडकेत चारजण जखमी

Published On: Feb 15 2018 1:56AM | Last Updated: Feb 15 2018 12:05AMफोंडा : प्रतिनिधी

कोने प्रियोळ येथे बुधवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने दुचाकीला ठोकर दिल्याने चारजण जखमी झाले असून यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या अपघातात विजय लाल (33) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. निशा भारती (30), मंगेश कुमार (6) व त्रिशा भारती (3, सर्व जण बोणबाग बेतोडा, मूळ उत्तर प्रदेश) या जखमींवर उपजिल्हा इस्पितळात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर अज्ञात कारचालक तेथून कार घेऊन पळून गेला.  

स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार (जीए-05-ए-0082) ही दुचाकी फर्मागुडीहून म्हार्दोळच्या दिशेने जात होती. यावेळी त्या दुचाकीच्या विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनाला ओव्हरटेक करीत असलेल्या कारची धडक दुचाकीला बसली. यात दुचाकीवरील चौघेजण रस्त्यावर फेकले गेले. मात्र, ठोकर दिलेल्या अज्ञात कारचालकाने न थांबताच तेथून पळ काढला. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विजय लाल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. 

हवालदार संदीप खाजनकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. फोंडा पोलिस पळून गेलेल्या अज्ञात कारचालकाचा शोध घेत आहे.