होमपेज › Goa › साखळी नगराध्यक्षांसह चौघांना अटक ; सुटका

साखळी नगराध्यक्षांसह चौघांना अटक ; सुटका

Published On: Feb 12 2019 1:05AM | Last Updated: Feb 12 2019 1:05AM
डिचोली : प्रतिनिधी

गोकुळवाडी साखळी येथील रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरत असल्याची सबब पुढे करून न्यायालयीन आदेशानुसार साखळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांच्या नेतृत्वाखाली  अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया सुरू असताना सरकारी कामात अडथळा निर्माण करून मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्यासह  चौघांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली. या प्रकरणी मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांनी पोलिस तक्रार नोंदवली होती. 

गोकुळवाडी साखळी येथील आनंद वेरेकर यांच्या दुकानाचा रस्त्याला लागून असलेल्या भागावर  लवादाकडे सुरू असलेला खटला फेटाळण्यात आल्यानंतर लगेच मुख्याधिकारी पंडित यांनी संबंधित बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी तयारी केली होती. या कामासाठीची सर्व यंत्रणा घेऊन मुख्याधिकारी सोमवारी सकाळी सदर दुकानाजवळ आले असता तेथे आलेल्या नगराध्यक्ष धर्मेश सगलानी व इतर नगरसेवक, माजी सरपंच प्रवीण ब्लेगन, माजी नगरसेवक रियाज खान व इतरांनी सदर कारवाईला विरोध करताना सरकारी कामात अडथळा आणला, आपल्याला शिवीगाळ केली, शारिरीक इजा करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मुख्याधिकारी प्रवीणजय पंडीत यांनी डिचोली पोलिस स्थानकात केली.त्यानंतर नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्यासह नगरसेवक दामू घाडी, माजी नगरसेवक रियाझ खान, दुकानमालक आनंद वेरेकर या चार जणांना पोलिसांनी अटक केली.

आनंद वेरेकर यांच्या दुकानाचा काही भाग बेकायदा असल्याच्या निकषावरील याचिका लवादाच्या न्यायालयात बाहेर पडल्यानंतर त्यांना सदर आपले प्रकरण पुढील न्यायालयात नेण्यासाठी अवधी देणे गरजेचे होते. मात्र तसे न करता मुख्याधिकारी पंडीत यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हे बांधकाम जमीनदोस्त केले आहे. सदर बांधकाम पाडण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावून सामान काढून ठेवण्यासाठी मुदत देणे गरजेचे होते, मात्र तसे न करता, तसेच पालिका नगराध्यक्ष या नात्याने आपल्याला व इतर नगरसेवकांनाही न कळवता हे काम पंडीत यांनी एकतर्फी केलेले आहे.

या वेळी माजी सरपंच प्रवीण  ब्लेगन यांनी  सदर कारवाई   पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरीत  असल्याचा आरोप  केला  असून अनेक बेकायदा कामे  सुरू असताना काँग्रेसचा सक्रिय कार्यकता  असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची टीका केली आहे.दुसरीकडे डॉ.प्रमोद सावंत यांनी या  कारवाईशी  आपला  संबंध नसल्याचे स्पष्ट  केले.