Mon, May 25, 2020 11:24होमपेज › Goa › बोरी खूनप्रकरणी चौघांना अटक; दोघे अद्याप फरार

बोरी खूनप्रकरणी चौघांना अटक; दोघे अद्याप फरार

Published On: Sep 09 2019 1:30AM | Last Updated: Sep 09 2019 1:30AM
मडगाव : प्रतिनिधी 
बोरी पुलाखाली मृतावस्थेत सापडलेल्या मनोरा राय येथील फ्रान्सिस्को कार्व्हालो (वय 33) या मजुराच्या खुनाचा अवघ्या 36 तासांत छडा लावून या प्रकरणातील चार संशयितांना अटक करण्यात मायणा कुडतरी पोलिसांना यश आले असून अन्य दोघे संशयित फरारी आहेत. 

दारू मागण्यावरून झालेल्या वादात फ्रान्सिस्कोचा फुटलेल्या दारूच्या बाटल्या आणि फार्कच्या साहाय्याने भोसकून खून केल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या संशयितांत नुवे येथील रायन रिमेडिओ अल्वारिस (21), विल्टन अँथोनियो कुतिन्हो (34), मेलबर्न जुजे कुतिन्हो (22) आणि मिंगलार शिरोडा येथील वेलांसियो मॅन्यूअल वाज (26) यांचा समावेश असून त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरी पुलाखाली फ्रान्सिस्कोचा मृतदेह 6 सप्टेंबर रोजी सापडला होता. सुरुवातीला त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण शवचिकित्सा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून आले होते. शिवाय धारदार शस्त्राने त्याला भोसकण्यात आल्याचे दिसून आले होते. पोलिस उपनिरीक्षक संजीत कांदोळकर यांनी राज्याच्यावतीने सदर प्रकरणाची तक्रार मायणा कुडतरी पोलिस स्थानकात नोंदवली होती. पोलिस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त, संदेश चोडणकर, रवी देसाई, विल्सन डिसोझा, तुषार लोटलीकर, राहुल परब, सलिम शेख, पोलिस शिपाई अविनाश नाईक, सोमनाथ नाईक, अजय नाईक, विकास नाईक, विकास कौशिक आणि चेतन कोळी यांनी तपासकार्यात मोलाची कामगिरी बजावली.

पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत फ्रान्सिस्को हा हमाली आणि रोजंदारी कामगार म्हणून काम करत होता. 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो मनोरा राय येथील कार्लटन बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. याच बारमध्ये वरील संशयित अन्य दोघांसोबत दारू पीत बसले होते. बार मालकाने फ्रान्सिस्को याला दारू देण्यास नकार दिल्याने त्याने आरडाओरड करण्यास सुरू केले होते. याच विषयावरून त्याची वरील संशयितांशी बाचाबाची झाली. वादाचे पर्यवसान भांडणात झाले. संशयितांनी इतर दोघाजणांबरोबर त्याच्यावर फुटलेल्या बाटल्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी विविध पथके तयार करून या भागातील सर्व बारमध्ये चौकशी केली. चौकशीच्या आधारे वरील चौघांवर पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघाही संशयितांनी आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. 

संशयितांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. फरारी असलेल्या इतर दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहे, असेही गावस यांनी सांगितले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रान्सिस्को 5 सप्टेंबर रोजी रात्री अन्य एका बारमध्ये दारू प्यायला होता. त्याला कोणी तरी त्या रात्री पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे तो घरी जाऊन नवीन कपडे घालून पुन्हा दारू पिण्यासाठी राय येथे मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या कार्लटन बारमध्ये आला होता. दारु देण्याच्या विषयावरून उद्भवलेल्या वादात वरील सहा जणांच्या गटाने त्याच्यावर फुटलेल्या बाटल्या आणि फॉर्कने सपासप वार केले. ही घटना बारच्या बाहेर घडल्याने या घटनेचा थांगपत्ता कुणालाही लागला नाही. मारहाणीत तो बेशुध्द झाल्याचे दिसून येताच संशयितांनी त्याला अ‍ॅक्टिव्हा स्कुटरवरुन बोरीच्या पुलावर आणले.सुरुवातीला त्यांनी त्याला नदीत फेकण्याचा प्रयत्न करुन पाहिला, पण पुलाच्या कठड्याला रेलिंग लावण्यात आल्याने रेलिंगवरून त्याला फेकणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे दुचाकीवर घालून त्यांनी फ्रान्सिस्को याला पुलाखाली आणून टाकले.

बुटावरून पटली मृताची ओळख 

चौकशी पथकातील पोलिसांच्या घरात गणपतीच्या निमित्ताने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पण फ्रान्सिस्कोच्या खुनाची घटना समोर येताच वरिष्ठ अधिकार्‍यांनी पोलिसांना ताबडतोब ड्युटीवर येण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिस पूजा सोडून ड्युटीवर दाखल झाले. कार्लटन बारजवळ झालेल्या झटापटीत फ्रान्सिस्कोचा बूट पडला होता. त्याची ओळख त्याच्या आई आणि बहिणीने पटवताच पोलिसांनी मनोरा राय पासून ते बोरी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे आणि लोकांनी आपल्या घरात बसवलेल्या खासगी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मदत घेऊन अवघ्या 36 तासांत संशयितांना गजाआड केले.