Wed, May 27, 2020 18:09होमपेज › Goa › गोव्याचा माजी मंत्री ‘कोरोना’ संशयित

गोव्याचा माजी मंत्री ‘कोरोना’ संशयित

Last Updated: Mar 21 2020 1:14AM
पणजी: पुढारी वृत्तसेवा

दुबई -गोवा- बंगळूर विमानाने प्रवास केलेला  गोव्याचा  एक  माजी मंत्री  ‘कोरोनाव्हायरस’चा संशयित रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र,  त्याने गोमेकॉतील ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये भरती होण्यास नकार दिला असून आपल्या घरीच राहणे पसंत केले आहे. त्याच्यावर नजर ठेवली जात असून त्याच्या रक्ताच्या आणि थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या  प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी  बुधवारी दिली. 

दरम्यान,या विमानात सदर माजी मंत्र्याशिवाय अन्य 42 प्रवासी होते. त्यातील  एका महिलेलाही ‘कोरोनाव्हायरस’ची लागण झाल्याचे समोर आले असूून  या विमानातून प्रवास केलेल्या अन्य 41 प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. दुबईहून आलेली सदर महिला 67 वर्षांची असून तिने  गोवामार्गे बंगळुरुला  त्याच फ्लाईटने पुढे प्रवास केला होता, असे राणे यांनी सांगितले.

राणे म्हणाले, की  दुबई- गोवा- बंगळूर या विमानातून प्रवास केलेल्या एका महिलेला ‘कोरोनाव्हायरस’ची लागण झाल्याचे उशिराने कळाले. या विमानातून प्रवास केलेल्या  सर्व प्रवाशांचे नाव व पत्ते शोधून काढण्यात आले आहेत. या विमानातील पाच प्रवाशी या महिलेच्या शेजारी बसले होते, त्यांचा या महिलेशी संपर्क आला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिच्यासोबत प्रवास केलेल्या आणि गोव्यात उतरलेल्या 36 सहप्रवाशांचा शोध घेतला असता  त्यापैकी 30 जण सापडले असून अजूनही आठ प्रवाशांचा शोध सुरू आहे. या सर्व प्रवाशांची ‘कोरोनाव्हायरस’संबंधी तपासणी केली जाणार आहे.

राज्यात ‘कोरोनाव्हायरस’च्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता राज्य सरकारने स्वत:च्या खर्चाने 10 ‘थर्मल स्कॅनर’ खरेदी करण्याचे ठरविले असून सदर स्कॅनर दाबोळी विमानतळ, एमपीटी, महत्वाच्या रेल्वे व बस स्थानकात उभारले जाणार आहेत. या ‘थर्मल स्कॅनर’ची किंमत प्रत्येकी 10 ते 25 लाख रुपयांपर्यंत आहे. याआधी दाबोळी विमानतळावर ‘कोरोनाव्हायरस’संबंधी आंतरराष्ट्रीय विमानातून आलेल्या विदेशी प्रवाशांचीच तपासणी केली जात होती. मात्र आता खबरदारी म्हणून देशी पर्यटक आणि प्रवाशांचीही तपासणी केली जाणार आहे.

या अनुषंगाने विमानतळ आणि मडगाव रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे. मात्र, रस्तामार्गे प्रवास करणार्‍यासंदर्भात काहीही उपाययोजना आखण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली असल्याने या दोन्ही राज्यांच्या सीमा सील करण्याची मागणी होत असली तरी गोव्यातील जनजीवन याच राज्यातून येणार्‍या  जीवनाश्यवक वस्तू आणि मालावर अवलंबून असल्याने सध्या हा निर्णय घेतला जाणार नाही.  याविषयी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडूनही या संदर्भात आपण सल्ला मागितला असल्याचे राणे यांनी सांगितले. 

पणजीत स्पा सुरूच, कारवाईचा इशारा

वाढत्या ‘कोरोनाव्हायरस’संबंधी खबरदारी घेताना शाळा, थिएटर्स, व्यायामशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी पणजी शहरातील एका प्रसिद्ध ‘स्पा व मसाज पार्लर’ने आपले व्यवहार सुरूच ठेवल्याचे आढळून आले आहे.  राज्यातील ‘मॉल’ही बंद ठेवण्याचा आदेश काढावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. याशिवाय, राज्यातील काही फार्मसीमध्ये मास्क आणि सॅनिटायजर्सचा काळाबाजार केला जात असून चढत्या किंमतीने ते विकले जात असल्याच्या तक्रारी आरोग्य खात्याकडे आल्या आहेत. सदर स्पा आणि फार्मसीवर कडक कारवाई केली जाणार असून सुधारणा न झाल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सािंगितले. 

प्रशासकीय बैठकांना मनाई 

राज्य सरकारच्या सर्वसाधारण प्रशासनाने (जीएडी) पर्वरी येथील सचिवालयात महत्वाच्या सोडून अन्य कोणत्याही  बैठका घेण्यास मनाई केली आहे. याशिवाय, सरकारी खात्याच्या विभाग प्रमुखांना अथवा संचालकांना सचिवालयात येण्यास बंदी घातली आहे. ज्या सरकारी कर्मचार्‍यांना सर्दी, खोकला आणि ताप असेल त्यांनी घरीच विश्रांती घेऊन वैद्यकीय उपचारानंतरच कामावर रुजू व्हावे, अशी सूचना करणयात आली आहे. सर्व कर्मचार्‍यांनी वारंवार आपले हात साबणाने धुवून स्वच्छ करावेत, असे ‘जीएडी’ ने बुधवारी पाठवलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.