Mon, May 25, 2020 13:50होमपेज › Goa › वाळपईत वन संशोधन केंद्र स्थापणार 

वाळपईत वन संशोधन केंद्र स्थापणार 

Last Updated: Feb 13 2020 12:08AM
पणजी : पुढारी वृत्तसेवा 

राज्यातील वनक्षेत्राची पुरेपूर माहिती तयार करण्यासाठी वाळपई येथे ‘वन संशोधन केंद्र’  स्थापन करणार असून राज्य वनौषधी मंडळातर्फे हिरडा, भीरडा, आवळा, अर्जून या सारख्या 60 दुर्मिळ  औषधी वनस्पतींच्या  माहितीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.  

राज्यातील रानातील वनौषधे गोळा केली जात नसल्याने त्या वाया जातात. यामुळे त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. सदर वनौषधी लोकांना अल्प दरात वाटली जाणार आहेत. याशिवाय, राज्यातील म्हादई, नेत्रावळी, मोले अभयारण्यात पर्यटकांना  ट्रेकींग करण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने ‘ट्रेकींग मार्गदर्शक’ तयार केले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगारही प्राप्त होईल, असेही सावंत म्हणाले. आल्तिनो येथील वन खात्याची नवी व सुसज्ज अशा ‘गोवा वन भवन’ इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते.  

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की राज्यातील सर्व वन विभागातील वनरक्षक आणि अधिकार्‍यांसाठी पहिल्यांदाच एकाच ठिकाणी कार्यालयाची या इमारतीत सोय केलेली आहे. या एकाच कार्यालयातून राज्यातील सर्व वन क्षेत्रातील कामांवर नजर ठेवली जाणार आहे. राजधानीत सुसज्ज असे कार्यालय स्थापन करण्यात आले असले तरी राज्यातील सर्व अभयारण्यात निवासी व्यवस्था करून देखभाल करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. राज्यातील वन्यप्राण्यांचे रक्षण करण्यासाठी   काळजी घेतली जात आहे.  लोकांशी चांगले संबंध ठेवावेत, अशी सूचना आपण वन खात्याच्या कर्मचार्‍यांना दिलेली आहे.

या वन भवन इमारतीचे बांधकाम गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने केले आहे. या इमारतीत सौर पॅनलची सुविधा असून इमारतीसाठी आवश्यक असलेली 30 टक्के उर्जेची निर्मिती त्याद्वारे होते. वन भवनात विविध विभागांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा म्हापशाचे आमदार जोशआ डिसोझा यांनी सांगितले. 

यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी वन भागात पेट्रोलिंगचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी वन खात्याने खरेदी केलेल्या 24 मोटर बाईकना हिरवा बावटा दाखवून सुरवात केली. जैवविविधता मंडळाने प्रकाशित केलेल्या  जैवविविधता पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी महापौर उदय मडकईकर, मुख्य सचिव परिमल राय, वन खात्याचे प्रधान सचिव पुनितकुमार गोयल, प्रधान मुख्य वनपाल सुभाष चंद्र व जीएसआयडीसी व वन खात्याचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

‘व्याघ्र क्षेत्रा’बाबत अद्याप निर्णय नाही : मुख्यमंत्री

केंद्रीय वन मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी गोव्यातील चार वाघांच्या मृत्यूनंतर तयार केलेला अहवाल अधिकृतरित्या सरकारला पाठविण्यात आलेला नाही. आम्ही केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाला सदर अहवाल पाठविण्यास सांगितला आहे. या अहवालात ‘व्याघ्र क्षेत्रा’बाबत काय शिफारशी सुचविण्यात आल्या आहेत, याची माहिती घेतल्यानंतरच त्यावरील कारवाई बाबतचा आढावा घेतला जाणार आहे. या अहवालानुसार, राज्यात ‘व्याघ्र क्षेत्रा’बाबत काय शक्य आहे याचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. हा अहवाल तयार करणे सोपे असले तरी त्याच वनक्षेत्रात स्थानिक लोक राहतात, त्यांची घरे आहेत याचाही विचार करणे आवश्यक आहे. राज्यातील वानांची राज्य सरकार काळजी घेत असून राज्यात सुमारे 35 टक्के वनक्षेत्र आहे. राज्यात वन्यप्राण्यांची सुरक्षा व काळजी घेण्यास सरकार समर्थ आहे.